इंग्लंडमध्ये या वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघांची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक तरुण खेळाडूंना संधी देत नवीन विराट कोहलच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाठवण्याची तयारी वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असणाऱ्या मालिकेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न निवड समितीचा आहे. एकीकडे विराटच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न संपूर्ण देश पाहत असतानाच भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याने संघाच्या नेतृत्वाबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
‘क्रिकबझ’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजय जडेजाने, ‘२०१९ वर्ल्डकपच्या संघाचे नेतृत्व विराट कोहली ऐवजी महेंद्रसिंग धोनीने करायला हवे’ असे मत व्यक्त केले आहे. संघाचे कर्णधारपद हे वर्ल्डकप स्पर्धेपुरते धोनीकडे द्यायला हवे असे सांगतानाच हा बदल केवळ या स्पर्धेपुरता असावा असंही जडेजाने म्हटले आहे. जर कोणाला विराटचे नेतृत्व हे धोनीच्या नेतृत्वापेक्षा जास्त सक्षम वाटत असेल तर ते चुकीचे आहे. या विषयावर मला चर्चा करायला आवडेल असं जडेजा म्हणाला आहे.
याआधी अनेक माजी क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपच्या संघामध्ये धोनी असणे कशाप्रकारे फायद्याचे ठरले याबद्दल आपली मते मांडली आहे. सुनिल गावस्कर, सौरभ गांगुली यासारख्या माजी खेळाडूंबरोबर सध्याच्या संघामधील अनेक खेळाडूंनी धोनी वर्ल्डकपसाठी संघात हवाच असे मत वेळोवेळी व्यक्त केले आहे. धोनी वर्ल्डकपच्या संघात असणे ही विराटसाठी सर्वात फायद्याची गोष्ट ठरणार असल्याचे मत गावस्कर यांनी व्यक्त केले होते. यष्टीरक्षक म्हणून संघात धोनी असल्याचे विराटला डावपेच आखण्यासाठी फायदा होईल असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
या मुलाखतीमध्ये अजय जडेजाने वर्ल्डकपसाठी कोणता संघ पाठवावा याबद्दलही आपले मत मांडले. जडेजाच्या या वर्ल्डकप संघामध्ये धोनीला कर्णधार करण्याबरोबरच इतरही खेळाडूंची निवडही गोंधळात टाकणारी आहे. जडेजाने आपल्या संघामध्ये रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांनाही जागा दिली आहे. जडेजाच्या संघामध्ये चार फिरकी गोलंदाज आहेत. इंग्लंडमधील मैदाने पाहता भारत या स्पर्धेत एकाच वेळी चार फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जडेजाने निवडलेला वर्ल्डकपचा संघ:
रोहित शर्मा
शिखर धवन किंवा के. एल. राहुल
विराट कोहली
महेंद्रसिंग धोनी (कप्तान व विकेटकीपर)
ऋषभ पंत<br />दिनेश कार्तिक
अंबाती रायडू
हार्दिक पांड्या
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव<br />युजवेंद्र चहल
जसप्रीत बुमराह<br />मोहम्मद शमी
रविंद्र जडेजा
रविचंद्रन अश्विन