भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिवपद हा आमच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचाच गौरव झाला आहे. महाराष्ट्राने क्रिकेट क्षेत्रात संघटनात्मक स्तरावर केलेल्या कार्याचीच ही पोचपावती आहे, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले.
शिर्के यांची रविवारी बीसीसीआयच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल शिर्के म्हणाले, ‘सचिवपद ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. मंडळातील सर्व सहकारी व विविध संलग्न संघटनांच्या सहकार्याने मी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडेन असा आत्मविश्वास आहे. यंदाचे वर्ष महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवास्पद आहे. ट्वेन्टी २० सामना, कसोटी सामन्याचे केंद्र, तसेच नजीकच्या काळात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्याची संधी यामुळे महाराष्ट्र क्रिकेट संघटना सतत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक प्राप्त संघटना राहणार आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांना जेवढी ही संघटना खूप वाईट संघटना वाटते, तेवढी ही संघटना वाईट नाही. मंडळाने कोणाचाही एक पैसा थकविलेला नाही. आर्थिक ताळेबंद, हिशोबांचे लेखापरीक्षण, विविध प्रकारचे कर आदी सर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत. देशातील अन्य राष्ट्रीय संघटनांच्या तुलनेत आमचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. अन्य खेळांच्या राष्ट्रीय स्तरावरील मतभेदांमुळे त्या खेळांची काय अवस्था झाली आहे हे आपण सतत पाहात आहोत. आमच्या संघटनेने कधीही खेळाडूंचे नुकसान केलेले नाही.’