न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आणि एजाज पटेलने मुंबई कसोटी सामन्यात भारताविरुद्धच्या १० विकेट्सच्या विक्रमावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एजाजने हा पराक्रम आपल्या मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे. मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एजाजने शानदार गोलंदाजी करताना टीम इंडियाच्या डावातील सर्व १० बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एजाजने ४७.५ षटकात ११९ धावा देत १० बळी घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भीमपराक्रमानंतर एजाज पटेलने इंडियन एक्स्प्रेसशी खास संवाद साधला. तो म्हणाला, “हा पराक्रम करण्यासाठी बराच वेळ लागला. माझ्या गोलंदाजीच्या अॅक्शनसाठी मी सुमारे सात ते आठ महिने काम केले. माझ्या अॅक्शनमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले आणि एका टप्प्यावर आल्यानंतर मी माझ्या अॅक्शनवर समाधानी झालो. यासाठी खूप काम केले. मी माझ्या कारकिर्दीत नेहमीच कठोर परिश्रमावर भर दिला आहे. मी कठोर परिश्रम आणि अनेक बदलांनंतर १० बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे.”

वडिलांची एक गोष्ट आपल्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट कशी ठरली, याचा खुलासा एजाजने केला. तो म्हणाला, ”वयोगटातील क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही मला न्यूझीलंडच्या अंडर-१९ संघात स्थान मिळाले नाही. याबद्दल मी निराश झालो. कारण एक युवा खेळाडू असल्याने तुम्ही अंडर-१९ संघाचा भाग असाल, तरच तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होऊ शकता असा तुमचा विश्वास असतो. तेव्हा मला वाटले की मी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पण तरीही माझी निवड झाली नाही. माझे नावही राखीव खेळाडूंमध्ये नव्हते. याबाबत मी माझ्या वडिलांशी फोनवर बोलत असताना मला रडू कोसळले. मग त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. जे आजही माझ्या कानात गुंजत आहे. मग त्यांनी मला सांगितले, की निवड न होण्यामागे काहीतरी ठोस कारण असले पाहिजे आणि ते तुम्ही शोधा. वडिलांच्या शब्दाने माझा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला. तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि मी वेगवान गोलंदाजाकडून फिरकीपटू बनलो.”

हेही वाचा – ASHES : दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियानं मारली बाजी; पाहुण्यांचा २७५ धावांनी उडवला धुव्वा!

‘मुंबईकर’ एजाज पटेलने ज्या चेंडूने १० विकेट्स घेतल्या, तो चेंडू त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला दान केला होता. एजाज पटेलचा हा चेंडू संग्रहालयात ‘प्राइड ऑफ द पॅलेस’ म्हणून ओळखला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajaz patel gave a big reaction to his record of 10 wickets against india in mumbai adn