भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात किवी संघाचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने इतिहास रचला. एजाज पटेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट्स घेतल्या, अशी कामगिरी करणारा तो कसोटी इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला होता. एजाज पटेलने १० बळी घेतलेला चेंडू मुंबई क्रिकेट असोसिएशनला दान केला.
एजाज पटेलच्या या कृतीचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी कौतुक केले आहे. एजाज पटेलचा १० विकेट्सचा चेंडू संग्रहालयात ‘प्राइड ऑफ द पॅलेस’ म्हणून ओळखला जाईल. या संदर्भात त्यांनी पीटीआयला सांगितले, ”वानखेडे स्टेडियमवर एजाजने जे केले तो एक मोठा पराक्रम आहे आणि आमच्या ऐतिहासिक मैदान वानखेडेवर त्याने हा विक्रम केला आहे, जो आम्हाला या ऐतिहासिक मैदानाची नेहमीच आठवण करून देईल.”
एजाज पटेलने दिलेल्या चेंडूबद्दल विजय पाटील पुढे म्हणाले, ”तो खूप दयाळू आहे. हे यश संपादन केल्यावर त्याने आम्हाला क्रिकेट बॉल दिला. त्यामुळे या गोष्टीला आम्ही खूप महत्त्व देतो. अशा वस्तू संग्रहालयात पाहून तरुणांना प्रेरणा मिळेल.” १९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रॅफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडली यांनी सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा एजाजने मोडीत काढला.
रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर हे सर्व दिग्गज खेळाडू मुंबई संघातून बाहेर पडले आहेत आणि टीम इंडियाच्या महान खेळाडूंपैकी एक बनले आहेत. याशिवाय या मैदानावर भारतीय संघाने २८ वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषक जिंकला. २०११मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने षटकार ठोकून संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले.