Ranji Trophy Mumbai vs Haryana: रणजी ट्रॉफी २०२४-२५ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रणजी ट्रॉफीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. ज्यात मुंबईचा सामना हरियाणा संघाविरूद्ध होत आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले आहे.
अजिंक्य रहाणेने उत्कृष्ट खेळी करत हरियाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. रहाणेने १६०व्या चेंडूवर १२ चौकारांसह आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकामुळे मुंबई संघाची सामन्यावरील पकडही मजबूत झाली आहे. रहाणेच्या शतकापासून मुंबई संघाने ३०० धावांचा आकडा पार केला आहे.
दुसऱ्या डावात मुंबईच्या पहिल्या २ विकेट ५० धावांतच पडल्या. त्यानंतर १०० धावांचा टप्पा गाठण्यापूर्वीच संघाने तिसरी विकेटही गमावली. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रहाणेने सूर्यकुमार यादवच्या साथीने संघाचा डाव फक्त सावरला. रहाणेला सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचीही चांगली साथ मिळाली.
अजिंक्य रहाणेसह सूर्यकुमार यादवने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारने ८६ चेंडूत ७० धावा केल्या. गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवची बॅट शांत होती, त्याला अखेरीस मुंबईच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सूर गवसला. रहाणेच्या पाठोपाठ आलेल्या डावखुऱ्या अष्टपैलू शिवम दुबेनेही चांगली फलंदाजी केली. शिवम दुबे ४८ धावा करत बाद झाला.
मुंबई व हरियाणा रणजी ट्रॉफी अपडेट्स
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३१५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रहाणेने ५८ चेंडूंचा सामना करत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या होत्या. तर तनुष कोटियनने ९७ धावा आणि शम्स मुलानीने ९१ धावा केल्या होत्या. मुंबईच्या ३१५ धावांना प्रत्युत्तर देताना हरियाणाचा पहिला डाव ३०१ धावांवरच आटोपला. हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने पहिल्या डावात शतक झळकावले होते. पण शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे हरियाणाचे इतर सर्व फलंदाज फेल ठरले आणि मुंबईला पहिल्या डावात १४ धावांची आघाडी मिळाली.
तर दुसऱ्या डावात सध्याच्या घडीला मुंबईचा संघ ७ बाद ३३३ धावांवर खेळत आहे. शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियनची जोडी मैदानात आहे. तर मुंबईकडे आता एकूण ३४७ धावांची आघाडी आहे.