२५ नोव्हेंबर म्हणजेच उद्या गुरुवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता भारताची नजर कसोटी मालिकेवर आहे. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पहिला सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे आहे. अजिंक्यने उद्या श्रेयस अय्यर कसोटी पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारताचा अनुभवी सलामीवीर के. एल. राहुल मांडीच्या दुखापतीमुळे मालिकेला मुकणार आहे. राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला असून तो आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांपैकी एकाला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती.

हेही वाचा – VIDEO : विराट कोहली मुंबईत करतोय सराव; राजदीप सरदेसाई म्हणतात, “सकाळी उठून त्याची बॅटिंग…”

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्याची नजर आता कसोटीतही क्लीन स्वीपवर असेल. ग्रीन पार्क स्टेडियमच्या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. न्यूझीलंडला येथे कधीही भारताला हरवता आलेले नाही. टीम इंडियाने ग्रीन पार्क येथील शेवटच्या ६ पैकी ५ कसोटी सामने जिंकले. येथे भारताचा शेवटचा पराभव १९८३ मध्ये वेस्ट इंडिजकडून झाला होता. भारतीय संघ या मैदानावर ३८ वर्षांपासून अजिंक्य आहे. आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा/उमेश यादव, मोहम्मद सिराज.

Story img Loader