पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय संघातील स्थान गमावून बसलेले अनुभवी खेळाडू फलंदाज अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या वर्षिक कराराच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्याच वेळी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना वरील श्रेणीत बढती मिळणे अपेक्षित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बीसीसीआय’च्या नव्या कार्यकारी परिषदेची २१ डिसेंबरला बैठक होणार असून, या बैठकीत वार्षिक करारांबाबतचे निर्णय घेतले जातील. नव्या यादीत सूर्यकुमार आणि गिल यांची वेतनश्रेणी वाढू शकते, तर रहाणे, इशांत यांना वगळले जाऊ शकते. ट्वेन्टी-२० संघाचा भावी कर्णधार म्हणून हार्दिक पंडय़ाकडे बघितले जात आहे. त्यामुळे सध्या ‘क’ श्रेणीत असलेल्या हार्दिकला ‘ब’ श्रेणीत बढती मिळू शकते. करारात ‘अ+’श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपयांचे वार्षिक मानधन मिळते.

नव्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत एकूण १२ विषय चर्चेत येतील. ही बैठक आभासी पद्धतीने होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी आणि बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील अपयश हे मुद्दे विषयपत्रिकेवर नसले तरी, अध्यक्षांना आवश्यक वाटल्यास या विषयांवर चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर देशांतर्गत स्पर्धेत वापरण्यात येणाऱ्या व्हीजेडी पद्धतीचे जनक व्ही. जयदेवन यांना एकरकमी मानधन देण्याबाबतचा मुद्दाही पुढे येऊ शकतो.

विषय पत्रिकेवरील प्रमुख मुद्दे

  • खेळाडूंची वेतनश्रेणी निश्चित करणे
  • ‘बायजू’ आणि ‘एमपीएल’ या पोशाख पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांविषयी निर्णय घेणे
  • सल्लागार संस्थेची नियुक्ती करणे
  • भारतातील आगामी आंतरराष्ट्रीय हंगामातील सामन्यांच्या ठिकाणांना मान्यता देणे
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya rahane ishant sharma ditched from annual deal hardik suryakumar gill get promoted ysh