इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत झालेल्या भारताच्या पराभवाचे खापर माजी कर्णधार सौरव गांगुली याने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीवर फोडले आहे. संघाबाबतच्या काही विशिष्ट निर्णयांमुळे भारताने हा पराभव ओढवून घेतला असल्याची जोरदार टीका त्याने केली आहे. अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुलच्या संघातील अनुपस्थितीबाबतही त्याने व्यवस्थापनाला जाब विचारला आहे.
या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर पुढील दोनही सामने जिंकून इंग्लंडने भारताला पराभूत केले. या दोनही सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजय मिळवला आणि मालिका २-१ने खिशात घातली. या पराभवानंतर एका कार्यक्रमात गांगुलीने भारतीय संघ व्यवस्थापनावर सडकून टीका केली.
भारतीय संघाची वरची फळी ही अत्यंत प्रतिभावान आहे. पण ही फळी फलंदाजीत अपयशी ठरली, तर मात्र संघाला अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागते. सध्या टीम इंडियापुढील ही एक मोठी समस्या ठरत आहे. इंग्लंडच्या संघाप्रमाणे आपल्या संघातही समतोल असण्याची गरज आहे. राहुल आणि अजिंक्य या दोघांना संघ व्यवस्थापनाच्या सततच्या प्रयोगांमुळे पुरेशी संधी मिळू शकलेली नाही, असा आरोप गांगुलीने केला.
चांगली कामगिरी करूनही राहुलला डावलले गेले. अजिंक्यबाबतही तेच होताना दिसत आहे. भारताला वरच्या फळीतील पहिले ४ फलंदाज हे कायम सर्वोकृष्ट असले पाहिजेत. हे दोघे भारताचे उत्तम फलंदाज आहेत. या दोघांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर स्थान दिले तर संघाची फलंदाजीची बाजू निश्चितच भक्कम होईल, असेही गांगुलीने नमूद केले.