२०१७-१८ च्या रणजी हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सर्वाधीक विजेतेपदं मिळवलेल्या मुंबईचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध होणार आहे. मात्र या लढतीसाठी भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने, आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. अजिंक्य रहाणे रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाकडून खेळतो. १४ ऑक्टोबरपासून मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश या सामन्याला सुरुवात होणार आहे.

निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर याच्या अध्यक्षतेखाली संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अजिंक्यने रणजी सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं. अजिंक्य सध्या आपल्या पत्नीसोबत सेशेल्समध्ये सुट्टीवर आहे. अजिंक्यच्या या निर्णयामुळे निवड समितीच्या सदस्यांनी चांगलंच आश्चर्य व्यक्त केलं आहे. अजिंक्यच्या निर्णयामुळे निवड समिती चांगलीच नाराज झाली असून, त्याच्यासारख्या खेळाडूकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसल्याचा सूर निवड समितीच्या बैठकीत उमटला होता.

१ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने आपला शेवटचा टी-२० सामना खेळला. यानंतर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अजिंक्यला संघातून वगळण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड आणि भारताची मालिका सुरु होणार आहे. अशावेळी कोणत्याही खेळाडूसाठी दोन आठवड्यांची विश्रांती ही पुरेशी असते. पहिल्या सामन्यात मुंबईचे महत्वाचे खेळाडू हे भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय संघाकडून खेळत आहेत. अशावेळी अजिंक्य रहाणे मुंबईच्या संघात असणं फायदेशीर ठरु शकलं असतं. मात्र अजिंक्यने पहिल्या सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितल्याने निवड समितीला चांगलाच धक्का बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर हे मुंबईचे महत्वाचे खेळाडू सध्या अध्यक्षीय संघाकडून खेळत आहेत. त्यातच बलविंदरसिंह संधू आणि तुषार देशपांडे ही मुंबईची जलदगती गोलंदाजांची जोडगोळी सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत मुंबईला पहिल्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागली आहे. जर खेळाडू रणजी करंडकाऐवजी सराव सामन्यांना जास्त महत्व देणार असतील, तर रणजी स्पर्धेचं महत्व कमी होईल असं म्हणत एमसीएच्या अधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ –

आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, जय बिस्ता, सुफियान शेख, विजय गोहील, आकाश पारकर, रोस्टन डायस, मिनाद मांजरेकर, आदित्य धुमाळ, शिवम मल्होत्रा, शुभम रांजणे, एकनाथ केरकर

Story img Loader