ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची असेल तर भारतीय फलंदाजांना मोठय़ा भागीदाऱ्या रचून डावाची उभारणी करण्याची गरज असल्याचे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने सांगितले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी काहीशी कमकुवत असल्याने या दौऱ्यात भारताला मालिका जिंकण्याची संधी असल्याचे मानले जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर रहाणे याने अनेक मुद्दय़ांवर भाष्य केले. ‘‘२०१४-१५ साली माझी आणि विराट कोहलीची २६२ धावांची भागीदारी जशी झाली होती, तशाच मोठय़ा भागीदाऱ्यांची गरज भारताला या दौऱ्यात लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून आमच्या संघातील प्रमुख फलंदाजांवरच लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचा फायदा अन्य फलंदाजांना मिळू शकेल. प्रत्येक फलंदाजाला संघाच्या यशात योगदान देण्याची उत्सुकता असते. त्यामुळे अशा मोठय़ा भागीदाऱ्यांमध्ये डावाची बांधणी केल्यास सामने आणि मालिका जिंकता येईल, असा मला विश्वास वाटतो. गेल्या वेळी विराटसोबत केलेल्या भागीदारीदरम्यान मिचेल जॉन्सन हा विराटला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्या बाजूने मी माझ्या शैलीनुसार खेळण्याचा आनंद लुटत होतो. तर विराट दोन्ही स्तरांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत होता. प्रत्येक मालिकेत तुम्हाला नव्याने सुरुवात करणे आवश्यक असते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही आम्ही खूप काही शिकलो असून त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. तुम्ही परदेशात जाता त्यावेळी दौऱ्याच्या प्रारंभी चांगली कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे असते,’’ असेही रहाणेने सांगितले.
‘‘२०१४ सालच्या दौऱ्यात माझी वैयक्तिक कामगिरी चांगली झाली होती. मात्र, वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी ही अधिक महत्त्वाची असते. पण त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह नंतरच्या विदेश दौऱ्यांमधूनदेखील मी खूप काही शिकलो.
काही वेळा मी अर्धशतक किंवा ७०-८० धावांपर्यंत पोहोचलो. तेवढय़ावरच समाधान न मानता त्या खेळीचे शतकी खेळीत रूपांतर करण्याची आवश्यकता असल्याची मला जाणीव आहे. ऑस्ट्रेलियाकडे या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नसले तरी त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी सक्षम आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना त्यांचीच संभाव्य विजेते म्हणून गणना होणे साहजिक आहे. पण भारतीय संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या भूमिका आणि जबाबदारीची जाणीव असल्याने ही कसोटी मालिका निश्चितच रंगतदार होईल,’’ असा विश्वास रहाणेने व्यक्त केला.