Ajinkya Rahane on Rohit Sharma Form Ahead of Ranji Trophy: रोहित शर्मा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मातून जात आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही हिटमॅनची बॅट पूर्णपणे शांत होती. सततच्या अपयशामुळे रोहितने अखेरच्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपला गेलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळायला उतरणार आहे. मुंबईच्या रणजी सामन्यापूर्वी कर्णधार अजिंक्य रहाणे रोहित शर्माबाबत पाहा काय म्हणाला…
भारतीय कर्णधार जवळपास १० वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाचा जम्मू काश्मीरविरूद्धचा सामना २३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. रहाणेला रोहितच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, हिटमॅनला काय करायचे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही.
जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेला रोहितच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रहाणे म्हणाला, “सर्वात महत्त्वाचं काय आहे की, त्याला चांगली कामगिरी करत राहण्याची भूक आहे. रोहितला एकदा सूर गवसला आणि त्याची बॅट तळपली की तो मोठी खेळी खेळेल याची मला खात्री आहे. कालच्या काही नेट सेशन्समध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. चढ-उतार हा प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीचा भाग असतो.”
पुढे रहाणे म्हणाला, “मला रोहितवर खूप विश्वास आहे. रोहित नेहमीच रिलॅक्स असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतानाही तो सारखाच असतो. त्याला त्याचा खेळ चांगला माहीत आहे, त्यामुळे त्याला काय करावं लागेल हे कोणीही त्याला सांगण्याची नाही. एकदा का त्याला सूर गवसला की तो चांगली कामगिरी करेल. रोहित कधीच बदलला नाही आणि हीच त्याची एक चांगली गोष्ट आहे.”
रहाणेने असंही सांगितले की, ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सामन्यासाठी रोहित उपलब्ध असेल की नाही, याबाबत खात्री नसल्याचे सांगितले आहे. रोहित १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ६ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
रोहित शर्माचे फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी रोहितचा फॉर्म खेळाडू आणि कर्णधार म्हणून संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. रोहित इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आपला फॉर्म परत मिळवत स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.