Leicestershire Sign Ajinkya Rahane: टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या १ वर्षापासून त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, रहाणेसाठी हा दौरा फारसा चांगला ठरला नाही आणि त्याला दोन्ही डावांत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या दौऱ्यापासून त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. दरम्यान, अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे.
काऊंटीमधील लीसेस्टरशायर संघाने काउंटी चॅम्पियनशिप आणि वन डे चषकाच्या दुसऱ्या भागासाठी अजिंक्य रहाणेचा संघात समावेश केला आहे. अजिंक्य रहाणे लीसेस्टरशायरसाठी ५ काउंटी चॅम्पियनशिप सामने आणि संपूर्ण एकदिवसीय चषक स्पर्धा खेळणार आहे. रहाणे पूर्वीच लीसेस्टरशायर संघामध्ये दाखल होणार होता, मात्र रहाणेने काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. रहाणे संघात आता विआन मुल्डरची जागा घेणार आहे.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, लीसेस्टरशायरकडून खेळण्याची आणखी एक संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. क्लॉड हेंडरसन आणि अल्फोन्सो थॉमस यांच्याशी चांगलं बॉन्डिंग तयार झालं आहे आणि मी या उन्हाळ्यात क्लबसाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी गेल्या वर्षी संघाच्या निकालांवर लक्ष ठेवून होतो आणि मी जे पाहिले त्यावरून खूप प्रभावित झालो. मी माझ्या क्रिकेटचा आनंद लुटू शकेन आणि या हंगामात क्लबसाठी अधिक यश मिळवू शकेन अशी आशा आहे.
अजिंक्य रहाणेने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला भारताकडून आतापर्यंत १९५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ८ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५.०७७ धावा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावांचा समावेश आहे. त्याने टी-२० सामन्यात ३७५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १५ शतके आहेत.