कोलकाता नाईट रायडर्स संघाने नव्या हंगामासाठी अनुभवी अजिंक्य रहाणेची नियुक्ती केली आहे. वेंकटेश अय्यर उपकर्णधार म्हणून काम पाहील. केकेआर संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी सांगितलं की, ‘अजिंक्यचा अनुभव संघासाठी अत्यंत मोलाचा असेल. त्याचं नेतृत्व कौशल्य सगळ्यांनाच ठाऊक आहे. अजिंक्यच्या नेतृत्वात आम्ही जेतेपद कायम राखू’.

नव्या जबाबदारीसंदर्भात बोलताना अजिंक्य म्हणाला, ‘कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आमच्याकडे अतिशय संतुलित असा संघ आहे. जेतेपद राखण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे’.

कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या हंगामाच्या सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीने करणार आहे. २२ मार्चला कोलकाता इथे इडन गार्डन्स मैदानावर हा मुकाबला होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२, २०१४ आणि २०२४ मध्ये आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं होतं. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाची कमाई केली होती. श्रेयसच कोलकाताचा कर्णधार असेल अशी चिन्हं होती मात्र लिलावापूर्वी श्रेयस कोलकाताचा भाग नसणार हे स्पष्ट झालं. लिलावात पंजाब किंग्ज संघाने श्रेयसला ताफ्यात दाखल केलं.

महिनाभरापूर्वी झालेल्या लिलावात सुरुवातीच्या टप्प्यात अजिंक्य रहाणे अनसोल्ड गेला होता. दहापैकी एकाही संघाने त्याला संघात घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. लिलावाच्या पुढच्या टप्प्यात कोलकाता संघाने अजिंक्यला त्याच्या बेस प्राईजला अर्थात १.५० कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलं. याच लिलावात कोलकाता संघाने अष्टपैलू वेंकटेश अय्यरसाठी तब्बल २३.७५ कोटींची बोली लावली. अनेक संघ वेंकटेशला ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी आतूर होते पण कोलकाताने निश्चय ढळू न देता प्रचंड पैसे खर्चून वेंकटेशला पुन्हा संघात सामील केलं. वेंकटेशसाठी कोलकाताचा निर्धार पाहता तो भावी कर्णधार असू शकतो असं संकेत मिळत होते. पण केकेआर संघव्यवस्थापनाने सगळ्यांना धक्का देत रहाणेला कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला.

अजिंक्यने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत १८५ सामन्यांमध्ये अजिंक्यने ४६४२ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

लिलावापूर्वी कोलकाता संघाने सहा खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आंद्रे रसेल, रिंकु सिंग, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांचा समावेश होता. रिंकूकडे नेतृत्व सोपवलं जाणार अशाही चर्चा होत्या. आंद्रे रसेल आणि सुनील नरिन हे अनुभवी खेळाडू अनेक वर्ष कोलकाता संघाचा भाग आहेत. जगभरात अन्य लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. या दोघांपैकी एकाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळू पडू शकते अशाही चर्चा होत्या. पण या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम देत कोलकाताने अजिंक्यकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

त्यानंतर झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत अजिंक्यच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं होतं. अजिंक्यने या स्पर्धेत ५८.६२च्या सरासरीने ४६९ धावा केल्या. अजिंक्यचा स्ट्राईकरेट १६४.५६ असा खणखणीत होता.

Story img Loader