आपण कितीही मोठे झालो, जग जिंकायची स्वप्न पाहिली तरी आपल्या आईसाठी आपण तिचं लहान बाळच असतो. आज संपूर्ण जगभरात मातृ दिन साजरा केला जात आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं खूप महत्व असतं. शब्दांत कितीही मांडण्याचा प्रयत्न केला तरीही काहीतरी राहून जातं ही भावना म्हणजेच आई. आजच्या या खास दिवशी भारतीय संघाचे खेळाडूही मदर्स डे साजरा करत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावरुन आपल्या आईला आणि पत्नीला मदर्स डे च्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
माझ्या आयुष्यातील सर्वात दोन खास महिला…अशा शब्दांत अजिंक्यने आपली आई आणि पत्नी राधिकाला मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अजिंक्यची पत्नी राधिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अजिंक्यने आपल्या मुलीचं नाव आर्या असं ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द बहरण्यामागे आपल्या आईचे खूप कष्ट असल्याचं अजिंक्यने याआधी वारंवार नमूद केलं आहे.
Two of the most special women in my life, wish you a very Happy Mother's Day!#MothersDay pic.twitter.com/du9ZiD9vZ5
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 10, 2020
कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?
आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुलं जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?
९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.