Ajit Agarkar’s reaction to Virat’s strike rate : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आता टी-२० विश्वचषक २०२२ नंतर टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताकडून खेळताना दिसणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये चांगली फलंदाजी करत आहे, परंतु त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल बरीच चर्चा आहे. कोहलीबाबत अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की तो हळू खेळतो आणि त्याचा खेळ या फॉरमॅटला शोभत नाही. आता विश्वचषकासाठी संघ निवडीनंतर रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही चर्चा झाली.
कोहलीच्या स्ट्राईक रेटवर कोणतीही चर्चा झाली नाही –
पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न विचारला असता, हा प्रश्न ऐकून संघाचा कर्णधार रोहित शर्मा हसू लागला. यानंतर अजित आगरकर म्हणाला की, “विराट कोहली आणि त्याच्या स्ट्राईक रेटबद्दल आम्ही चर्चाही केलेली नाही. तो एक महान खेळाडू आहे आणि संघासाठी त्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे.” याशिवाय, पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक संघात निवड झालेल्या शिवम दुबेबद्दल कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, “तो टी-२० विश्वचषकात गोलंदाजी करेल आणि हार्दिक पांड्याही गोलंदाजी करेल. तो हंगामी क्रिकेटपटू आहे आणि संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
‘…म्हणून चार फिरकीपटूंची निवड करण्यात आली’
यावेळी विश्वचषकासाठी संघात चार फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “मला निश्चितपणे ४ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाज हवे होते. हार्दिक पंड्या हा चौथा वेगवान गोलंदाज म्हणून संघात आहे. पण मला ४ स्पिनर्स हवे होते. त्यामुळेच या संघात चार फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे.” रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची या विश्वचषकासाठी संघात फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. संघात चार फिरकीपटूंची निवड का करण्यात आली, यावर रोहितने सांगितले की, याचे उत्तर अमेरिकेला जाऊन देऊ. मात्र, चार फिरकीपटू निवडण्यामागे काही तांत्रिक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”
टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवराज चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.