Virat Rohit dropped from first two matches against Australia: आशिया चषक २०२३ चे विजेतेपद पटकावल्यानंतर आता टीम इंडिया २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. १८ सप्टेंबरला या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. तेव्हा अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. यामध्ये रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच रोहित आणि कोहली व्यतिरिक्त हार्दिक पांड्याला पहिल्या २ सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्वचषकापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्याच्या निर्णयावर विचारलेल्या प्रश्नाला टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही उत्तर दिले. आगरकर म्हणाले की, “रोहित आणि कोहली नेहमीच आमच्यासोबत असतात आणि हार्दिकही आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळले पाहिजे. काही स्तरावर खेळाडूंना मानसिक विश्रांतीची गरज आहे, जी स्पर्धेपूर्वी इतकी वाईट गोष्ट नाही. तिसऱ्या सामन्यात प्रत्येकजण खेळण्यासाठी उपलब्ध असेल.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवचाही समावेश नव्हता. यावर आगरकर म्हणाला की, “कुलदीपने आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यामुळे आम्हाला इतर खेळाडूंनाही आजमावण्याची संधी मिळाली आहे. मोठ्या स्पर्धेपूर्वी आम्ही खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती देऊ इच्छितो, हे आम्ही आणखी एका प्रकारे पाहू शकतो.”
हेही वाचा – IND vs AUS: सहा वर्षांत दोन वनडे खेळणारा अश्विन २१ महिन्यांनंतर परतला, काय आहे रोहित-आगरकरचा प्लॅन?
तिसर्या वनडेसाठी सर्व महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध –
या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील संघाबाबत अजित आगरकर म्हणाले की, “या सामन्यासाठी सर्व खेळाडू उपलब्ध आहेत आणि आमचा विश्वचषक संघ खेळताना दिसेल. आत्तापर्यंत बाहेर बसलेल्या खेळाडूंना आजमावण्याची संधी या मालिकेत मिळाली.”
पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ –
लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविंद्रन, रविंद्रन आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पाड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.