अतिशय उत्सुकता निर्माण झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए)निवडणुकीत मोहन भावसार, सुंदर अय्यर व रवींद्र कांबळे यांची प्रथमच कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली. प्रशांत देशपांडे, प्रताप जाधव, एम. एफ. लोखंडवाला, किशोर वैद्य व वली महंमद यांची फेरनिवड झाली.
एमओएच्या कार्यकारिणीतील आठ जागांकरिता तेरा उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही निवड एकमताने व्हावी यासाठी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केले होते. सोमवारी सायंकाळी त्याकरिता सर्व उमदेवारांची बैठक घेण्यात आली. मात्र रेखा भिडे यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. हॉकी संघटक रेखा भिडे यांनी यापूर्वीच माघार घेतली होती, मात्र अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर त्यांचा माघारीचा अर्ज आल्यामुळे नियमानुसार मतपत्रिकेत त्यांचे नाव कायम राहिले.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे निरीक्षक राजीव मेहता व निवडणूक अधिकारी निवृत्त न्यायाधीश एस. एन. सरदेसाई यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला.
सभेच्या सुरुवातीला सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी निवडणूक एकमताने व्हावी असे आवाहन केले. तथापि त्यास कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. एमओएशी संलग्न असलेल्या २४ संघटनांपैकी याटिंग संघटनेचा अपवाद वगळता अन्य २३ खेळांच्या संघटनांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी खो-खो संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, कुस्तीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जलतरणाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिम्नॅस्टिक्सच्या अध्यक्ष मीरा कोरडे, ज्यूदोचे सरचिटणीस दत्तात्रय आफळे, व्हॉलिबॉलचे अध्यक्ष विजय डांगरे हे या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरचिटणीस मोहन भावसार हे सर्वाधिक मते मिळवत निवडून आल्याचे लांडगे यांनी सांगितले. त्याखालोखाल प्रशांत देशपांडे (तिरंदाजी), सुंदर अय्यर (टेनिस), प्रताप जाधव (सायकलिंग), रवींद्र कांबळे (व्हॉलिबॉल), एम. एफ. लोखंडवाला (रोईंग), किशोर वैद्य (जलतरण), वली महंमद (फुटबॉल) हे निवडून आले. एम. व्यंकटेश, शीला कानुगो, अमिन दयानंद कुमार व अशोकसिंग रजपूत यांचा पराभव झाला.
एमओएत महिलांना स्थान नाही!
महाराष्ट्रास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंमध्ये महिला खेळाडूंची संख्या मोठी असली तरी एमओएच्या कार्यकारिणीत महिलांना स्थान नाही हे येथे स्पष्ट झाले. यंदा रेखा भिडे व शीला कानुगो या दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी रेखा भिडे यांनी माघार घेतली. कानुगो यांचा मात्र पराभव झाला. एमओएने यापूर्वी एम. एफ. लोखंडवाला यांना स्वीकृत सदस्य म्हणून स्थान दिले होते. त्याप्रमाणे कार्यकारिणीत एखाद्या महिला संघटकास स्थान दिले जावे, अशी आशा अनेक महिला खेळाडू व संघटकांनी व्यक्त केली.
काका-पुतण्यांची अनुपस्थिती!
शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रातून निवृत्त होण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यामुळेच एमओएचे अध्यक्ष म्हणून ते या बैठकीस उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे पुतणे अजित पवार हे मुंबईत विधानसभेचे कामकाज सुरू असल्यामुळे येऊ शकले नाहीत. शरद पवार यांच्याऐवजी एमओएचे नूतन अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या निवडीवर येथे शिक्कामोर्तब करण्यात आले.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रल्हाद सावंत, अशोक पंडित, प्रदीप गंधे, जय कवळी यांची, तर सहसचिवपदी प्रकाश तुळपुळे व महेश लोहार यांची, खजिनदारपदी धनंजय भोसले यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

Story img Loader