महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण हा राजीनामा देत असल्याचे पवार यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पवार यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक २६ मार्चला होणार आहे. १६ मार्च ही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. परंतु कार्यकारिणी सदस्यांशिवाय बाकी सर्व पदांवर बिनविरोधपणे निवड झाली. शरद पवार यांनी गेली २८ वष्रे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. कबड्डी, खो-खोप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवरही शरद पवार यांचा क्रीडाक्षेत्रातील नेतृत्वाचा वारसा अजित पवार यांच्याकडे चालत आला. शनिवारी अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली. पवार यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडे एकाच संघटनेचे पद असणे बंधनकारक असते. या पाश्र्वभूमीवर पवारांनी राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद सोडल्याचे म्हटले जात आहे.

‘‘आम्ही या कठीण परिस्थितीतून मार्ग काढू. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी ध्येय-धोरणे निश्चित करण्यात येतील. याचप्रमाणे संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रमही ठरविला जाईल. अजित पवार यांनी पद सोडले असले तरी माजी अध्यक्ष म्हणून त्यांचे मार्गदर्शन संघटनेला मोलाचे असेल!’’
– मोहन भावसार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह

अध्यक्षपदासाठी भाई जगताप यांचे पारडे जड
अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला संघटनेवरील त्यांचे नियंत्रण मात्र कायम राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील व्यक्ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारेल, अशी चर्चा आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष भाई जगताप हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. जगताप यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे अजित पवार त्यांच्या नावाला प्राधान्य देतील, असे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी जगताप यांच्याच नेतृत्वाखाली वडाळ्यात वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली होती.
याशिवाय मदन पाटील यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे. याचप्रमाणे अजित पवारांच्या खास मर्जीतील किरण पावसकर यांनाही संधी मिळू शकते. गतवर्षी पावसकर यांनी शिवाजी पार्कवर व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दिमाखादारपणे घेऊन दाखवली होती. परंतु पावसकर यांच्याकडे कबड्डीमधील कोणत्याही जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व नाही. पण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची माळ बिनविरोधपणेच एखाद्या खंद्या व्यक्तीच्या गळ्यात पडेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या गजानन कीर्तिकर यांनी अध्यक्षपदासाठी उत्सुकता दर्शविल्यास मात्र प्रत्यक्षात निवडणूक होऊ शकेल.

Story img Loader