Akash Chopra criticized ICC and demanded to play India vs Pakistan: डब्ल्यूटीसी २०२३-२५ स्पर्धे च्या नवीन सायकलची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ डब्ल्यूटीसी सायकल २०२३-२५ मध्ये १९ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया या डब्ल्यूटीसी सायकल दरम्यान ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. डब्ल्यूटीसी सायकलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने, इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने आणि बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामने घरच्या मैदानावर खेळेल.
याशिवाय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने, वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी सामने आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामने परदेशी भूमीवर खेळणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासह भारतीय क्रिकेट संघाचे डब्ल्यूटीसी सायकला सुरू होणार आहे. त्याचवेळी, आयसीसीने डब्ल्यूटीसीचे नवीन वेळापत्रक जाहीर करताच, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आयसीसीसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आयसीसीला फटकारले आणि सांगितले की डब्ल्यूटीसी ही आयसीसी स्पर्धा आहे. त्यात भारत-पाकिस्तान सामने नाहीत. हे आश्चर्यकारक आहे. आकाश पुढे म्हणाला, “तुम्ही सर्व संघांविरुद्ध खेळत नाही.पण ही डब्ल्यूटीसी आहे, ही आयसीसीची स्पर्धा आहे, आता ४ वर्षे झाली आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान शिवाय आयसीसी स्पर्धेची तुम्ही कल्पना करू शकता का? हे कधीच घडू शकत नाही. हे नेहमी स्पर्धेच्या सुरूवातीला घडते. त्यामुळे ते व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगले झाले असते. त्याला सर्वोच्च रेटिंग मिळते आणि लोक त्यातून पैसाही कमावतात.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “जर डब्ल्यूटीसी ही आयसीसी स्पर्धा असेल, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात नक्कीच सामने व्हायला हवेत. तसे नसेल तर मी स्वीकारायला तयार आहे, कारण आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होतात. अशा परिस्थितीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने व्हायला हवेत.”
आकाश चोप्राने थेट आयसीसीला बदल सुचवले आणि म्हणाला, “मग, डब्ल्यूटीसी हा आयसीसीचा कार्यक्रम नाही का? जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाला आयसीसीची गदा मिळते. म्हणूनच सायकलमधील सर्व सामने आयसीसीच्या कक्षेत असायला हवेत.हा देखील आयसीसीचा कार्यक्रम आहे. नसल्यास, कृपया स्पष्ट करावे. याला द्विपक्षीय क्रिकेट म्हणा आणि स्वीकारा की तुम्ही कसोटीला ग्लॅमराइज करण्यासाठी डब्ल्यूटीसी तयार केले आहे.”
आकाश चोप्राने हे सल्ले दिले –
१.किमान तीन कसोटी असाव्यात
२. भारत आणि पाकिस्तान संघाचा सामना डब्ल्यूटीसी सायकलमध्ये असावा
३.डब्ल्यूटीसी फायनलमध्ये तीन सामन्यांची मालिका असावी. (तीन पैकी सर्वोत्तम)
हेही वाचा – MPL 2023: एमपीएलच्या उद्धाटन सामन्यात ऋतुराजचा पुणेरी आणि केदारचा कोल्हापूर संघ आमनेसामने, कोण मारणार बाजी?
आकाश चोप्रा यांनी डब्ल्यूटीसी फायनलबद्दल देखील सांगितले की अंतिम तीन सामन्यांची मालिका असावी, ज्यामध्ये अंतिम फेरीतील दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना त्यांच्या घरच्या मैदानावर आणि एक सामना तटस्थ ठिकाणी खेळतील.