टी २० वर्ल्डकपमध्ये सुपर १२ फेरीचे सामने सुरु असताना माजी क्रिकेटपटू उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे अंदाज बांधत आहेत. माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचं भाकीत वर्तवलं आहे. त्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने थेट अंतिम फेरीत कोणते दोन संघ असतील?, याबाबत ट्वीटरवरून भविष्यवाणी केली आहे. या दोन संघात भारताचं नाव नसल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आकाश चोप्राला खडे बोल सुनावले आहेत.
अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड आमनेसामने असतील, असं माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने सांगितलं आहे. पाकिस्तान सलग तीन सामने जिंकल्याने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. तर इंग्लंडनेही सलग तीन सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघ चांगल्या फॉ़र्मात असून त्यांना विजयाचा दावेदार मानलं जात आहे.
आकाश चोप्राने भविष्यवाणी करताच भारतीय क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. एका सामन्यावरून भारताचा अंदाज बांधल्याने क्रीडाप्रेमींनी खडे बोल सुनावले आहेत. तसेच काही जणांनी खूपच लवकर अंदाज बांधल्याचं सांगितलं आहे.
भारताचा न्यूझीलंड व्यतिरिक्त अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबिया यांच्याशी लढत आहे. भारत आगामी सर्व सामने जिंकल्यास पाकिस्तान आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचतील.