Aakash Chopra on Jasprit Bumrah: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात एक-दीड वर्षानंतरर शानदार पुनरागमन केले. पहिल्याच षटकात त्याने २ विकेट्स घेतले. मात्र, या सामन्यात त्याने केवळ १३२-१३३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. तो १४०-१४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो पण, सध्या तो करत नसल्याने यावर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने सूचक विधान केले. तो म्हणाला की, “जसप्रीत बुमराहचा वेग चिंतेचे कारण नाही, याला दोन पैलू आहेत”
माजी खेळाडू आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “प्रश्न असा आहे की जसप्रीत बुमराह १४०-१४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत नाही. एक चेंडू १४०च्या पुढे गेला आणि बाकीचे चेंडू १३०च्या पुढे गेले. तो फिट आहे की नाही? त्याने चांगले पुनरागमन केले आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्याच्या वेगाची मला काळजी नाही. मला वाटतं लय चांगली आहे आणि वेग काय नंतरही सापडेल.”
स्विंगिंग स्थितीत वेग कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो- आकाश चोप्रा
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “याला दोन बाजू आहेत. जेव्हा तुम्ही स्विंगिंग स्थितीत खेळता तेव्हा तुमचा वेग थोडा कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही १०० टक्के वेगाने गोलंदाजी करू नका, ८० टक्के फिटनेसच्या वर जाऊ नका. समजा तुमचा टॉप स्पीड १४० किमी प्रतितास आहे, जर तुम्हाला बॉल स्विंग करायचा असेल तर सुमारे १३२-१३३ प्रतितास ठेवा.”
जसप्रीत बुमराहला थोडे सावध राहावे लागेल- आकाश चोप्रा
दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहला थोडे सावध राहावे लागेल, असे आकाश चोप्राचे मत आहे. तो पुढे म्हणाला, “दुसरी गोष्ट म्हणजे तो बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळत आहे. इतक्या दिवसांनी जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही थोडे सावध होतात. हा असाही सामना होता जिथे तुमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने ही भारतासाठी चांगली बाब आहे.”
जसप्रीत बुमराहला जास्त जोर लावण्याची गरज नाही- आकाश चोप्रा
आकाश चोप्रा त्याच्या गोलंदाजीबाबत पुढे म्हणाला की, “जसप्रीत बुमराहला मालिकेच्या पहिल्या सामन्यात जास्त ताकद लावण्याची गरज नाही. तुम्ही पहिल्या षटकात स्टंपला हिट केले आणि दुसरा फलंदाज स्कूप शॉट खेळत बाद झाला. मग १९व्या षटकात तुम्ही फक्त एक धाव दिली, त्यामुळे तुम्हाला जास्त जोर लावण्याची अजिबात गरज नव्हती. जर तुम्हाला कोणी जोर लावायला सांगत नसेल, तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज नाही. बुमराहला हळू हळू स्वत: ला वेग वाढवावा लागेल.”