Akash Chopra’s statement on Sanju Samson: भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसनवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्राच्या मते जर केएल राहुल तंदुरुस्त झाला, तर संजू सॅमसनला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळणार नाही. तसेच आशिया चषकासाठी टीम इंडियामध्येही त्याला स्थान मिळणार नाही, असे तो म्हणाला. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, केएल राहुल उपलब्ध नसेल तर त्याला दोन्ही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
वास्तविक संजू सॅमसनची कामगिरी वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान चांगली झालेली नाही. एक-दोन डाव सोडले तर उर्वरित सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. आकाश चोप्राच्या मते, केएल राहुल तंदुरुस्त झाला तर संजू सॅमसनला संघात स्थान मिळणार नाही. मात्र, केएल राहुल तंदुरुस्त नसल्यास सॅमसनला संघात स्थान मिळू शकते. याबाबत आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सांगितले.
संजू सॅमसनची निवड केएल राहुलवर अवलंबून – आकाश चोप्रा
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “सध्याची परिस्थिती पाहता, जर केएल राहुल उपलब्ध असेल, तर मला संजू सॅमसन वर्ल्ड कप टीममध्ये दिसत नाही. तसेच मला तो आशिया चषक संघात दिसत नाही. मात्र, जर केएल राहुल तंदुरुस्त नसेल, तर कदाचित तुम्ही त्याला आशिया कप संघात पाहू शकता आणि विश्वचषक संघातही त्याचा समावेश होऊ शकतो. केएल राहुल उपलब्ध आहे की नाही यावर सर्व काही अवलंबून आहे.” याआधी माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलने संजू सॅमसनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तो म्हणाला होता की, जेव्हा संजू सॅमसन संघात नसतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल खूप बोलतो की त्याला संधी मिळायला हवी होती, पण त्याने स्वतःला मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही.
टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत पिछाडीवर –
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. त्यानंतर तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत ७ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेतही संजू सॅमसनची बॅट तळपली नाही. त्याने वनडे मालिकेत फक्त एका सामन्यात अर्धशतक झळकावले होते, तेव्हापासून त्याने मोठी खेळी केली नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी (१२ ऑगस्ट) फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ पिछाडीवर आहे.