Aakash Chopra’s Big statement about Hardik Pandya : आयपीएल २०२४ च्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील या वेळापत्रकानुसार पहिला सामना चेपॉक स्टेडियमवर २२ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराटचा आरसीबी आणि धोनीचा सीएसके संघ आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पंड्याबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे.
भारताचा माजी सलामीवरी आकाश चोप्राच्या मते मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रोमांचक होणार आहे. वास्तविक, लिलावानंतर, एमआयने हार्दिक पंड्याला गुजरातमधून ट्रेड करून त्यांच्या संघात परत घेतले आणि त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्यानंतर हार्दिकवर बरीच टीका झाली होती.
दरम्यान, पंड्याच्या पुनरागमनानंतर अहमदाबादचे चाहते आपल्या भावना व्यक्त करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असा विश्वास आकाश चोप्राने व्यक्त केला आहे. दोन यशस्वी हंगामानंतर जीटी सोडण्याच्या पंड्याच्या निर्णयाबद्दल आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली. आपल्या कर्णधारपदाच्या काळात, हार्दिकने २०२२ मध्ये संघाचे नेतृत्व करून आयपीएल जेतेपद पटकावले होते. तसेच २०२३ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु तेथे त्यांना सीएसकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले ‘अनोखे शतक’
‘अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्याला ट्रोल करावे’ – आकाश चोप्रा
जिओ सिनेमावरील एका शोमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, “मला वाटते की अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्याला ट्रोल करावे. मी तुम्हाला सांगतो का? पहिल्या आयपीएल हंगामातील मुंबई विरुद्ध कोलकाता हा सामना आम्ही वानखेडे स्टेडियमवर खेळत होतो. अजित आगरकर आमच्या संघात होता आणि तो मुंबईचा मुलगा असल्याने आम्हाला त्याला सीमारेषेबाहेर काढावे लागले. कारण तो मुंबईत मुंबईविरुद्ध खेळत होता. त्यावेळी वानखेडेवरच्या प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली होती. म्हणून आम्ही त्याला परत वर्तुळात ठेवले कारण ते चांगले नव्हते.”
हेही वाचा – VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “जर अहमदाबादच्या चाहत्यांनी हार्दिक पंड्याची खिल्ली उडवली नाही, गुजरात सोडून मुंबईत आल्याबद्दल चाहत्यांनी त्याला ट्रोल केले नाही, तर याचा अर्थ चाहत्यांचे मन दुखावले नाही. तसेच याचा अर्थ हार्दिकच्या जाण्यानंतरही चाहत्यांना काही फरक पडलेला नाही. त्यामुळे या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याला ट्रोल केले जावे असे मला वाटते. हार्दिक नाणेफेकीला गेल्यावर लोकांनी चिडवायला सुरुवात केली, तर लीग इथेच परिपक्व होते.”