Akash Chopra’s statement on Josh Hazlewood: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचा विश्वास आहे की, जोश हेझलवूड २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी कमकुवत दुवा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियन संघाने अलीकडेच भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्राथमिक १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट आणि नॅथन एलिस यांच्यासह हेझलवूड हे पाच प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत.
आकाश चोप्राचे हेजलवूडच्या गोलंदाजीबाबत मोठं वक्तव्य –
आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चोप्राने आगामी विश्वचषकातील वेगवान गोलंदाजीबद्दल सांगितले. ऑस्ट्रेलियाबाबत बोलताना तो म्हणाला, “मिचेल स्टार्क फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा अनुकूल परिस्थितीत गोलंदाजी करत नाही. आशियातील त्याचे आकडे तितकेच चांगले आहेत. १७ सामन्यात २३.२ च्या सरासरीने ३७ विकेट्स घेणे, अजिबात वाईट नाही. प्रत्येक सामन्यात दोनपेक्षा जास्त विकेट घेणे विलक्षण आहे. पॅट कमिन्स देखील तसाच आहे. आशियामध्ये त्याची आकडेवारी चांगली राहिली आहे.”
माजी भारतीय सलामीवीर पुढे म्हणाला, “तथापि, जोश हेझलवूडच्या रूपात तुम्हाला एक कमकुवत दुवा दिसतो. त्याची सरासरी २५.६ आणि इकॉनॉमी ४.५७ आहे, परंतु आशियातील आठ सामन्यांमध्ये त्याच्या फक्त सहा विकेट आहेत. त्याची सरासरी ६१ आहे. जोश हेझलवूडचे आकडे येथे खूपच खराब आहेत.” हेझलवूडने भारतात खेळलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात 9.3 षटकात १/५५ विकेटची नोंद केली आहे. त्याने श्रीलंकेत आशियातील आपले इतर सात एकदिवसीय सामने खेळले, जिथे त्याने ६२.६० च्या सरासरीने आणि ४.८९च्या इकॉनॉमी रेटने पाच बळी घेतले.
हेही वाचा – Virat Kohli: Asia Cup 2023 साठी ‘रन मशीन’ सज्ज, इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो
ट्रेंट बोल्टच्या आकडेवारीबाबत आकाश चोप्राची प्रतिक्रिया –
न्यूझीलंडबद्दल बोलताना चोप्राने निदर्शनास आणले की ट्रेंट बोल्टची आकडेवारी आशियामध्ये तितकी चांगली नाही. तो पुढे म्हणाला की, “ट्रेंट बोल्टची एकूण आकडेवारी अभूतपूर्व आहे, परंतु आशियामध्ये त्याची सरासरी ४० च्या आसपास आहे. त्याने १४ सामन्यांत केवळ १७ विकेट्स घेतल्या आहेत. तो इतका धोकादायक नाही. कारण तो जुन्या चेंडूने जास्त विकेट घेत नाही. तो मुख्यतः नवीन चेंडूचा गोलंदाज आहे. खूप आदर आहे, पण तो फक्त नवीन चेंडूने घातक आहे.”