Akash Chopra suggested Sai Sudarshan to replace Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमत आहे की पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार? दरम्यान, आकाश चोप्राने कोहलीची जागा घेण्यास पात्र असलेल्या एका खेळाडूचे नाव सुचवले आहे. यावर माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणाला, एक वेगळे नाव सुचवत आहे, पण चुकीचे नाव नाही.
खरंतर, विराट कोहलीची जागा घेण्यासाठी आकाश चोप्राने २२ वर्षीय साई सुदर्शनचे नाव सुचवले आहे. सुदर्शनने नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुदर्शन हा तोच खेळाडू आहे ज्याने आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्ससाठी ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची शानदार खेळी साकारली होती.
आकाश चोप्राने सुचवले साई सुदर्शनचे नाव –
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “माझ्या मनात येणारा तिसरा डावखुरा खेळाडू म्हणजे साई सुदर्शन. ही थोडी आउट ऑफ द बॉक्स सूचना आहे, पण चुकीची नाही. त्याने आयपीएल फायनलमध्ये धावा केल्या आहेत.” सुदर्शन तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलद्वारे टी-२० फॉरमॅटमध्ये, फर्स्ट क्लासद्वारे कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : राहुल द्रविडने घेतला मोठा निर्णय, केएल राहुलला ‘या’ जबाबदारीतून केले मुक्त
सुदर्शनने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या अनधिकृत चार दिवसीय कसोटी सामन्यात ९७ धावांची इनिंग खेळली होती. सुदर्शन इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत-अ संघाचा भाग आहे. अशा स्थितीत सुदर्शन हा डावखुरा फलंदाज म्हणून कोहलीच्या जागी बदली चांगला पर्याय ठरू शकतो.
सुदर्शनबद्दल माजी भारतीय खेळाडू पुढे म्हणाला, “त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. त्याने वनडेच्या पहिल्या दोन डावात धावा केल्या आणि इंग्लंडच्या लायन्सविरुद्ध ९० पेक्षा जास्त धावा केल्या. तो सातत्याने ज्या पद्धतीने धावा करतोय, त्यावरून असे वाटते की तो कसोटी क्रिकेटसाठी बनला आहे.”