Akash Chopra angry over Sarfaraz Khan’s non-selection: भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौऱ्यावर करणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी (२३ जून) एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली. यावेळी बोर्डाकडून कसोटी संघात मोठे बदल करण्यात आले. यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने सरफराज खानचे नाव कसोटी संघात न दिसल्याने बीसीसीआयवर जोरदार टीका केली. आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित करत सरफराजकडे वारंवार दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल केला. सरफराजबद्दल त्यांना काय आवडत नाही हे बोर्डाने सार्वजनिक करावे, असे तो म्हणाला. आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर ही प्रतिक्रिया दिली.
भारताचा माजी सलामीवीर म्हणाला, “सरफराजने काय करावे? गेल्या तीन वर्षांतील त्याची आकडेवारी पाहिली, तर तो बाकीच्यांपेक्षा सरस आहे. त्याने सर्वत्र धावा केल्या आहेत. तरीही, त्याची निवड झाली नाही तर… हा काय संदेश जातो?”
जर तुम्ही प्रथम श्रेणीच्या धावांना महत्त्व देत नसाल, तर तसं सांगा –
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अजून काही कारण असेल, तुम्हाला आणि मला माहीत नसलेली गोष्ट असेल तर ती सार्वजनिक करा. फक्त सांगा की तुम्हाला सरफराजची ती खास गोष्ट आवडली नाही आणि म्हणूनच तुम्ही त्याच्याबद्दल विचार करत नाही. पण असे काही आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. सरफराजला याबाबत कोणी सांगितले की नाही हे मला माहीत नाही. जर तुम्ही प्रथम श्रेणीच्या धावांना महत्त्व देत नसाल, तर तसं सांगा.”
आतापर्यंत सरफराजची फर्स्ट क्लास कारकीर्द –
मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने आतापर्यंत ३७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ५४ डावात फलंदाजी करताना ७९.६५च्या सरासरीने ३५०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १३ शतके आणि ९ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०१* धावा आहे.