दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक सुपर १२च्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाणेफेक गमावलेल्या वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचीही दमछाक झाली.
इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान लियाम लिव्हिंगस्टोन अकील हुसेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हुसनेने लिव्हिंगस्टोनचा अफलातून झेल घेत सर्वांना थक्क केले. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने फटका खेळला, पण चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली. हुसेनने आपल्या डाव्या बाजूला उडालेला चेंडू एका हाताने सूर मारत टिपला.
हेही वाचा – T20 WC: स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी खास उपाययोजना; एका बॉक्समध्ये…
हुसेनच्या या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. समालोचकांसोबतच सोशल मीडियावर हुसेनच्या या झेलला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल म्हटले गेले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० विश्वचषक सुपर-१२ च्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या वेस्ट इंडिजला ६ गड्यांनी मात दिली.
असा रंगला सामना…
इंग्लंडचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या फलंदाजांनी सुमार कामगिरीचे प्रदर्शन करत आपल्या चाहत्यांना निराश केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे विंडीजचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला. फिरकीपटू आदिल रशीदने २ धावात ४ बळी घेत वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुंग लावला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दबावात खेळत आपले चार फलंदाज गमावले, पण ९व्या षटकात त्यांनी विजय मिळवला. इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीला सामनावीर पुरस्कार मिळाला.