महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर आता सिडनीला होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कशाप्रकारे संघरचना असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अतिरिक्त यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला संघात स्थान देण्याशिवाय पर्याय नसला तरी नव्या वर्षांत नव्या संघनायकाच्या नेतृत्वाखाली खेळताना आणखी काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे अक्षर पटेल आणि सुरेश रैना यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धापासून चेंडू चांगला वळू लागतो. त्यामुळे कसोटीचे तिसरे आणि चौथे डाव हे फिरकीच्या बळावर जिंकता येतात. या पाश्र्वभूमीवर रविचंद्रन अश्विनसोबत युवा डावखुरा फिरकी गोलंदाज पटेलला संघात स्थान मिळू शकेल.
डाव्या खांद्यावरील दुखापतीवर उपचार घेण्यासाठी रवींद्र जडेजा मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी पटेल ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा नवा कर्णधार विराट कोहलीला पटेलच्या गोलंदाजीची जाणीव आहे. गुजरातच्या २० वर्षीय पटेलने ९ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी बहुतांशी सामने तो कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. याशिवाय प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ११ सामन्यांत ३८ बळी घेतले आहे. पटेलचा संघात समावेश झाल्यास चार गोलंदाजांच्या भारतीय माऱ्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादव यापैकी एकाला विश्रांती देण्यात येईल.
भारताच्या फलंदाजीच्या फळीकडे पाहिल्यास शिखर धवनच्या फलंदाजीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील सहा डावांमध्ये २७.८३च्या सरासरीने त्याने एकंदर १६७ धावा केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटीत धवनला वगळण्याची शक्यता आहे.
उदयोन्मुख सलामीवीर लोकेश राहुल हा मुरली विजय सोबत भारताच्या डावाला प्रारंभ करील. एकमेव कसोटी सामन्याच्या कामगिरीद्वारे राहुलचे मूल्यमापन करू नये, असे धोनीने म्हटले होते. पदार्पणाच्या सामन्यात राहुल चुकीचे फटके खेळून बाद झाला होता.
जर राहुलला संधी मिळाली नाही, तर अजिंक्य रहाणे सलामीला उतरेल. रणजी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव रहाणेच्या गाठीशी आहे. या परिस्थितीत रोहित शर्मा आणि सुरेश रैना मधल्या फळीत खेळतील.
धवन किंवा राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळाल्यास रोहित आणि रैना यांच्यापैकी एक जण संघात स्थान मिळवू शकेल. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात अद्याप रोहित आपल्या फलंदाजीला न्याय देऊ शकलेला नाही. परंतु पहिल्या तीन कसोटी सामन्यांत रैनाला संधी मिळालेली नाही.

Story img Loader