ICC World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०अशी अभेद्य आघाडी घेतली असून तिसरा सामन्यातही विजय मिळवण्याचा भारत प्रयत्न करेल. मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदोरमध्ये शतक झळकावणारा शुबमन गिल तिसरा सामना खेळणार नाही. गिलसोबतच शार्दुल ठाकूरलाही तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असून दोन्ही खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. याशिवाय अक्षर पटेलही वेळेत तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. त्याच्या अश्विनला संधी दिली जाईल. अशा परिस्थितीत अक्षर विश्वचषक खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल विश्वचषकात भारताच्या पहिल्या सराव सामन्यासाठी गुवाहाटी येथे भारतीय संघात सामील होतील. भारतीय संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी काही खेळाडूंवर वर्कलोड मॅनेजमेंट कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या चार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. दुसरीकडे, अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर तो विश्वचषक २०२३ खेळू शकणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.
अक्षर पटेलच्या या निर्णयावर टिप्पणी करताना बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “सुदैवाने आशिया चषकात भरपूर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तसे झाले नसते, तर आम्ही याकडे अन्य मार्गाने पाहिले असते. शारीरिक पेक्षा अधिक मानसिकरित्या खेळाडू कसा आहे, याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत. कधी कधी फिरकी गोलंदाजांना जास्त बरा होण्यास वेळ लागत नाही पण आम्ही लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंना मानसिक विश्रांतीची गरज असते. विश्वचषकासारख्या स्पर्धेपूर्वी जी वाईट गोष्ट नाही. आमच्याकडे पर्यायी गोलंदाज आहेत.”
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी रोहित, विराट, कुलदीप आणि हार्दिक उपलब्ध असतील. बीसीसीआयने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्टार गोलंदाज बुमराहला त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून सुट्टी देण्यात आली होती. तो राजकोटमध्ये भारतीय संघातही सामील होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात होता.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या डाव्या मनगटाच्या दुखापतीतून सावरणारा अक्षर पटेल तंदुरुस्त नसल्याचे आणखी एका अहवालातून समोर आले आहे. तो तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला असून सध्या तो एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. अक्षराच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात भारताकडून खेळण्याच्या अश्विनच्या आशा वाढल्या आहेत, जिथे त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. अश्विनने मोहालीत एक आणि इंदोरमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरच्या फिटनेसचा विचार करता अश्विन आणि त्याच्यापैकी एकाची निवड करणे निवडकर्त्यांना कठीण जाईल.