Akshar Patel on Team India: भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विश्वचषकापूर्वी दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे त्याला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी फिरकीपटू आर. अश्विनचा संघात समावेश करण्यात आला. पटेल आता पूर्णपणे बरा झाला असून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. पंजाबविरुद्ध २७ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी खेळत पटेलने शानदार पुनरागमन केले आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला असून अजून पुढील दोन सामने आतापर्यंतच्या माहितीनुसार खेळू शकणार नाही. त्यामुळे तो जर पूर्णपणे तंदुरस्त नसेल तर त्याच्या जागी अक्षर पटेलचा समावेश होऊ शकतो. मात्र, यासाठी आयसीसीची मान्यता घ्यावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुखापत होण्यापूर्वीही अक्षर पटेल चमकदार कामगिरी करत असल्याने त्याची आशिया चषक स्पर्धेत निवड झाली. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळू शकला नाही, या मालिकेत त्याच्या जागी आर. अश्विनची निवड करण्यात आली होती, त्यानंतर पहिल्यांदाच अश्विनचा विश्वचषक संघात समावेश होण्याची आशा निर्माण झाली होती. २८ सप्टेंबरपर्यंत सर्व देशांना त्यांच्या संघात बदल करण्याची शेवटची संधी होती. बीसीसीआयने आपल्या संघात बदल करताना जखमी पटेलच्या जागी अश्विनचा संघात समावेश केला आहे. तेव्हा पटेलला दुखापतीतून सावरण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: Team India: BCCIने वर्ल्ड कपच्या मध्यावर टीम इंडियाबाबत घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी

आता अक्षर पटेल केवळ तंदुरुस्त झाला नाही तर तो सामनेही खेळत आहे. गुजरातकडून खेळताना त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध २७ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. मात्र, ही खेळी त्याच्या संघाला सामना जिंकून देऊ शकली नाही. पंजाबने २३२ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात गुजरात संघ केवळ १९७ धावाचं करू शकला आणि सामना ३६ धावांनी गमावला. अक्षरने ५२ धावांच्या या खेळीत ४ षटकार ठोकले. गोलंदाजीतही त्याने चांगली कामगिरी केली, जरी त्याच्या नावावर एकही विकेट नसली तरी त्याने ४ षटकात केवळ ३० धावा दिल्या.

हेही वाचा: SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा केला सुपडा साफ! तब्बल १४९ धावांनी मिळवला दणदणीत विजय, महमुदुल्लाहचे शतक व्यर्थ

२९ वर्षीय अष्टपैलू अक्षर पटेलने भारतासाठी ५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५९ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा इकोनॉमी रेट हा ४.५४ आहे. त्याने ३४ डावात ४८१ धावा करत फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आगामी काळात उर्वरित विश्वचषकासाठी हार्दिक पांड्या जर पूर्णपणे तंदुरस्त झाला नाही तर त्याच्या जागी अक्षर पटेलची निवड होते का? याबाबत बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापन देखील विचार करत आहे. त्याला उर्वरित सामने खेळण्यासाठी आयसीसी परवानगी देईल का आणि बीसीसीआय तसा निर्णय घेईल? याबाबत क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहेत. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्याची दुखापत ही फारशी गंभीर नाही आणि तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshar patel who was out of the world cup due to injury played a stormy innings in smat scored 52 runs in 27 balls avw