सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाने इराणी करंडकावरही आपली पकड मजबूत केली आहे. शेष भारताला पहिल्या डावात 330 धावांमध्ये बाद केल्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात निर्णयाक आघाडी घेतली आहे. अखेरच्या फळीत अक्षय कर्णेवारचं शतक आणि संजय रामास्वामी- अक्षय वाडकरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विदर्भाने शेष भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. पहिल्या डावात विदर्भाचा संघ 425 धावांवर बाद झाला असून पाहुण्या संघाला 95 धावांची आघाडी मिळाली आहे.

दुसऱ्या डावात विदर्भाचे 6 फलंदाज माघारी परतल्यानंतर अक्षय कर्णेवारने अक्षय वाडकरसोबत भागीदारी रचली. अक्षय वाडकरने 73 धावांची खेळी रचली. दुसऱ्या बाजूने अक्षय कर्णेवारने 133 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 102 धावांची खेळी केली. कर्णेवारचं स्थानिक क्रिकेटमधलं हे पहिलं शतक ठरलं. कर्णेवारच्या या शतकी खेळीमुळे आणखी एक योगायोग जुळून आलाय.

2017-18 साली रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत अक्षय वाडकरने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना आपलं पहिलं शतक झळकावलं होतं. यंदाच्या इराणी चषकातही अक्षय कर्णेवारने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतकी खेळी केली. त्यामुळे हा योगायोग जुळून आल्यास विदर्भ यंदाचा इराणी करंडक पुन्हा जिंकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Story img Loader