बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे आणि तो भारतीय क्रिकेट संघाचा खेळ पाहण्यासाठी अनेकदा स्टेडियमला भेट देतो. अलीकडेच जेव्हा त्याला त्याच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंची नावे विचारण्यात आली तेव्हा, त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. यावर त्याने विराट कोहली किंवा रोहित शर्माचे नाव घेतले नाही. मात्र, इतर लोकांप्रमाणेच अक्षय कुमारचा आवडता क्रिकेटर विराट किंवा रोहित असू शकतो, असे अनेकांना वाटले असेल. पण तसे नव्हते.
आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षय कुमारने सध्याच्या संघातील त्याच्या आवडत्या भारतीय खेळाडूंची नावे सांगितली. तो म्हणाला, “सध्या माझे आवडते क्रिकेटपटू केएल राहुल आणि शिखर धवन आहेत.” केएल राहुल तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनला निवड समितीकडून संघात बोलावण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत शिखर धवनची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर हे युवा खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सातत्याने आपली दावेदारी मजबूत करत आहेत. केएल राहुलनेही रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून आपली पकड मजबूत केली आहे. तिसरा सलामीवीर म्हणून एका खेळाडूची निवड करावी लागते. यासाठी शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यापैकी कोणत्याही एका खेळाडूची निवड केली जाऊ शकते.
हेही वाचा – OMG..! आजच्या दिवशी रंगली होती कसोटी क्रिकेटची १ नंबर मॅच; शेवटच्या षटकात होती ६ धावांची गरज अन्…
विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची अलीकडेच नवीन वनडे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. २६ डिसेंबरपासून ही कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित या मालिकेला मुकणार आहे.