क्रीडा क्षेत्रात आकडय़ांना विलक्षण महत्त्व असते. मग ती शतके असोत, बळी असो वा आणखी अन्य काही. अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या निमित्ताने मायकेल क्लार्क आणि अ‍ॅलिस्टर कुक हे दोन्ही संघनायक आपल्या कारकिर्दीतील शंभराव्या कसोटीच्या उंबरठय़ावर आहेत.
क्लार्कच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत २-० असा आघाडीवर असून पर्थवरील तिसऱ्या कसोटीसह अ‍ॅशेसवर पुन्हा कब्जा करण्याचे मनसुबे त्यांनी आखले आहेत. कुकच्या इंग्लंड संघाने मागील तिन्ही अ‍ॅशेसवर वर्चस्व राखले होते. परंतु या संपूर्ण वर्षांत एकही सामना न हरणाऱ्या इंग्लंडच्या वाटय़ाला दोन सलग पराभव आले आहेत. त्यामुळे वैयक्तिक शतकी टप्प्याकडे दुर्लक्ष करीत दोन्ही कर्णधारांना अ‍ॅशेसमधील महत्त्वाच्या सामन्याचे अधिक गांभीर्य आहे.
३२ वर्षीय क्लार्कने २००४मध्ये भारतात कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ५२.५८च्या सरासरीने ७,९४० धावा केल्या आहेत. तथापि, पुढील महिन्यात २९ वर्षांच्या होणाऱ्या कुकनेसुद्धा भारताविरुद्धच २००६मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने ४७.२०च्या सरासरीने ७,८८३ धावा केल्या आहेत.

Story img Loader