अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती.. अर्धशतकवीर रॉस टेलर मैदानावर होता.. परंतु दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे षटक डेल स्टेनचे असल्यामुळे रंगत टिकून होती.. मग अपेक्षेप्रमाणेच ‘स्टेन’ गन धडाडली.. या निर्णायक षटकात फक्त एका चेंडूवर नॅथन मॅक्क्युलमने चौकार ठोकला, बाकीच्या पाचही चेंडूंवर एकही धाव निघाली नाही.. तीन फलंदाज मात्र धारातीर्थी कोसळले आणि २ धावांनी दक्षिण आफ्रिकेने हा सामना खिशात घातला.. ‘किमयागार’ स्टेनच्या खात्यावर १७ धावांत ४ बळी जमा होते. नाबाद ८६ धावांची घणाघाती खेळी साकारून दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचणाऱ्या जे पी डय़ुमिनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून हरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात मात्र आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभी ३ बाद ४३ अशी अवस्था झाल्यावर हशिम अमला (४१) आणि डय़ुमिनी यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. डय़ुमिनीने ४३ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारासह आपली खेळी साकारली. त्यामुळे द. आफ्रिकेने ६ बाद १७० धावा उभारल्या.
न्यूझीलंडकडून मार्टिन गप्तील (२२) आणि केन विल्यम्सन यांनी ५७ धावांची सलामी दिली. मग विल्यम्सनने रॉस टेलरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. विल्यम्सन (५१) बाद झाल्यावर टेलरला समोरून तोलामोलाची साथ मिळू शकली नाही. परंतु त्याने अखेपर्यंत झुंज देत ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. स्टेनच्या अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावा काढण्याचे आव्हान टेलरसमोर होते. परंतु योग्य फटका खेळण्यात टेलर अपयशी ठरला आणि न्यूझीलंडचा संघ रोमहर्षक लढतीत पराभूत झाला.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ६ बाद १७० (जे पी डय़ुमिनी नाबाद ८६, हशिम अमला ४१; कोरे अँडरसन २/२८) विजयी वि. न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १६८ (केन विल्यम्सन ५१, रॉस टेलर ६२; डेल स्टेन ४/१७, इम्रान ताहीर २/२७)
सामनावीर : जे पी डय़ुमिनी.

Story img Loader