Alex Hales Retirement: इंग्लंडचा स्टार फलंदाज अॅलेक्स हेल्सने शुक्रवारी (४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दोन महिने आधी हेल्सने हा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लिश संघाचा तो सदस्य होता. त्याने त्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हेल्सने त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
३४ वर्षीय अॅलेक्स हेल्सने ऑगस्ट २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १५६ सामने खेळले. त्याने सात शतकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० हून अधिक धावा केल्या. टी२० फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला इंग्लिश क्रिकेटर होता. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.
हेल्स पुढील वर्षी टी२० विश्वचषकात खेळू शकतो
अॅलेक्स हेल्सच्या निवृत्तीच्या निर्णयाने चाहते आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आश्चर्यचकित झाले. २०२४च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी या अनुभवी फलंदाजाला संघात स्थान मिळेल, असे मानले जात होते. पाकिस्तान सुपर लीग २०२३ मध्ये खेळण्यासाठी हेल्सने या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धच्या इंग्लंडच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्याचे वृत्त आहे.
अॅलेक्स हेल्स काय म्हणाले?
अॅलेक्स हेल्स म्हणाला, “तीन्ही फॉरमॅटमध्ये १५६ सामन्यांमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे याचा मला अभिमान आहे. मी काही आठवणी आणि संघातील सहकाऱ्यांची मैत्री आयुष्यभर टिकवून ठेवली आहे. मला वाटते की आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे.”
हेल्स पुढे म्हणतो, “इंग्लंडकडून खेळताना मी चढ-उतार पाहिले. हा एक संस्मरणीय प्रवास होता आणि इंग्लंडसाठी विश्वचषक फायनल खेळू शकलो याचे मला समाधान वाटते. चढ-उतारांनी भरलेल्या या प्रवासात मला माझे मित्र, कुटुंब आणि चाहत्यांकडून नेहमीच मोठा पाठिंबा मिळाला आहे.” हेल्सचा शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध २०२२च्या टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. हेल्सने सांगितले की, “तो नॉटिंगहॅमशायरसाठी तसेच फ्रँचायझी क्रिकेटसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहील.”
भारताविरुद्ध खेळलेली संस्मरणीय खेळी
गेल्या टी२० विश्वचषकात इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात हेल्सची महत्त्वाची भूमिका होती. त्याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या होत्या. कर्णधार जोस बटलरच्या मागे तो या स्पर्धेत इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. हेल्स २०१९ पासून एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला नाही, परंतु टी२० मध्ये तो संघाचा नियमित सदस्य होता. हेल्स सध्या द हंड्रेड २०२३ स्पर्धेत भाग घेत आहे. तो ट्रेंट रॉकेट्सच्या संघात आहे.
हेल्सचा असा आंतरराष्ट्रीय विक्रम
अॅलेक्स हेल्सने इंग्लंडकडून ११ कसोटी, ७० एकदिवसीय आणि ७५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २७.२८च्या सरासरीने ५७३ धावा केल्या ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये हेल्सच्या ३७.७९च्या सरासरीने २,४१९ धावा आहेत. हेल्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये ६ शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत. हेल्सचा टी२० इंटरनॅशनलमधील रेकॉर्ड चांगला होता. हेल्सने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३०.९५च्या सरासरीने २,०७४ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
ड्रग्ज घेण्याचा फटका सहन करावा लागतो
अॅलेक्स हेल्सचा २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंडच्या एकदिवसीय संघात देखील समावेश करण्यात आला होता, परंतु मनोरंजनासाठी अंमली पदार्थांचे सेवन केल्याबद्दल तो दोषी आढळला आणि त्याला संघातून वगळण्यात आले. यानंतर हेल्स जवळपास तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला नाही. गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून त्याने संघात पुनरागमन केले होते. आता एकदिवसीय विश्वचषक २०२३आधी हेल्सच्या निवृत्तीने इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.