लंडनमधील ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’ (एईएलटीसी) येथे वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सालाबादप्रमाणे याच ठिकाणी, २७ जून ते १० जुलै दरम्यान यावर्षीची विम्बल्डन टेनिस स्पर्धा होणार आहे. मुख्य स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने एईएलटीसीमध्ये पूर्वतयारीला वेग आला आहे. विम्बल्डनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट या पूर्वतयारीचे दोन अतिशय सुंदर व्हिडिओ शेअर केले आहेत.
विम्बल्डन ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठत ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्याही पूर्वीपासून ही स्पर्धा खेळवली जाते. विम्बल्डन हा एकमेव मोठी टेनिस स्पर्धा आहे जी अजूनही पारंपारिक गवतावर खेळवला जाते. १८७७ पासून लंडन येथील एईएलटीसीमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील ही स्पर्धा तितक्याच दिमाखात होणार आहे. एईएलटीसीने स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे.
या हंगामातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू भाग घेतील. विम्बल्डनमध्ये दोन वेळचा विजेता राफेल नदाल, सहा वेळा विजेता नोव्हाक जोकोविच, कॅस्पर रुड, स्टेफानोस तित्सिपास, कार्लोस अल्कराज आणि फेलिक्स ऑगर-अॅलिअसीम हे दिग्गज खेळताना दिसतील. तर, महिलांच्या गटात इगा स्विटेक, कोको गॉफ, सेरेना विल्यम्स खेळताना दिसतील. २४ जून रोजी मुख्य स्पर्धेसाठी ड्रॉ घेतले जाणार आहेत. त्यापूर्वी २१ जून ते २३ जून या काळात मुख्य स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळवली जाणार आहे.
दरम्यान, यावर्षीची स्पर्धा एईएलटीसीसाठी काहीशी विशेष असणार आहे. कारण, येथील सेंटर कोर्टला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत.