तिरंगी मालिकेत जेतेपदाचे शिखर गाठण्यासाठी भारतीय ‘अ’ संघासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र शेवटच्या लढतीत शिखर धवनच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका संघावर मात करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले. अंतिम सामन्यातही भारतीय संघाला शिखर धवनकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. धवनला दमदार साथ देणारा रोहित शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या साखळी लढतीत शानदार शतक झळकावत कर्णधार चेतेश्वर पुजाराने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. शेवटच्या हाणामारीच्या षटकांत अंबाती रायुडू चमकदार कामगिरी करत आहे. अनुभवी सुरेश रैना संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. फलंदाजीच्या आघाडीवर भारतीय संघ मजबूत आहे, परंतु गोलंदाजांच्या बाबतीत संघव्यवस्थापनाला चिंता भेडसावत आहे. धावा रोखण्याबरोबरच विकेट्स घेण्याची जबाबदारी जयदेव उनडकट, ईश्वर पांडे, परवेझ रसूल, शाहबाज नदीम या गोलंदाजांवर असणार आहे.