घराणेशाही भारतीयांसाठी नवीन नाही. राजकारणामध्ये आपल्या पक्षाचा, आडनावाचा, हातात असलेली ताकद यांच्या जोरावर घराणेशाहीला पेव फुटलेले साऱ्यांनीच पाहिले आहे. पण यामध्ये किती लायक आणि किती निकम्मे आहेत, हे साऱ्यांना कळून चुकले आहे. पण जिथे गुणवत्ता दाखवायची असते तिथे मात्र घराणेशाही चालत नाही, तिथे जर तुमचे नाणे खणखणीत वाजले नाही तर तुम्हाला थेट घरी बसवले जाते. फुटबॉलमध्येही अशी बरीच कुटुंबे आहेत जिथे कुणी वडील आणि मुलगा, कुठे भाऊ-भाऊ, कुठे नातू, तर कुठे पुतणे, असे सारे पाहायला मिळतात. पण या सर्वानी आपले स्थान कमावले आहे ते फक्त आणि फक्त गुणवत्तेच्याच जोरावर.
२०१०च्या विश्वचषकात ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरलेला उरुग्वेचा दिएगो फोर्लान सुपरिचित आहेच, पण त्याला हे बाळकडू त्याच्या वडिलांकडून मिळालेय. त्याचे वडील पाबेलो हे उरुग्वेचे बचावपटू होते. १९६६-७६ या कालावधीमध्ये त्यांनी देशाला बरेच नाव कमावून दिले. पण दिएगोने त्यांच्यापेक्षाही भरघोस यश संघाला मिळवून दिले. २०१०च्या विश्वचषकात उरुग्वेला जास्त चांगली कामगिरी करता आली नसली तरी दिएगोचे नाव मात्र साऱ्यांच्याच मुखात होते, या विश्वचषकात त्याने पाच गोल केले होते.
मार्क आणि अ‍ॅलेक्स चेंबरलिन या अशाच इंग्लंडच्या पिता-पुत्राच्या जोडीने इंग्लंडला नावलौकिक मिळवून दिला आहे. मार्क यांनी १९८२-८४ हा काळ चांगलाच गाजवला होता, त्यामुळे आता साऱ्यांचेच डोळे अ‍ॅलेक्सवर लागलेले आहेत.
फुटबॉल विश्वामध्ये पिता-पुत्राच्या जोडय़ांबरोबर भावांची जोडीही पाहायला मिळाली. ब्राझीलचा फॅबियो आणि त्याचा जुळा भाऊ राफेल या दोघांनीही ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले, पण जेवढे नाव फॅबियोने कमावले, तेवढे राफेलला कमावता आले नाही. फॅबियो हा मध्यरक्षकाबरोबर आक्रमण करण्यातही कधी मागे नाही.
नेदरलँड्सकडून फ्रँक आणि रोनाल्ड या जुळ्या बंधूंनी एकेकाळी धमाल उडवली होती. २००६पर्यंत या दोघांनी नेंदरलँड्सचे प्रतिनिधित्व केले. गेल्या दोन दशकांमध्ये इंग्लंडच्या संघामध्ये गॅरी आणि फिल या नेव्हिलेस बंधूंनी आपली चमक दाखवली. गॅरी इंग्लंडकडून ८५ सामने खेळला, तर फिल ५९ सामने. हे दोघेही संघासाठी बचावपटूची भूमिका यशस्वीपणे वठवत होते.
फुटबॉलमध्ये दोन बंधू फक्त एकाच संघातून नाही तर प्रतिस्पर्धी संघांतून खेळल्याचीही उदाहरणे आहेत. केव्हिन आणि जेरोम या बोटेंगस बंधूंच्या बाबतीत असे घडले आहे. या दोघांचा जन्म जर्मनीचा, दोघांनी फुटबॉलचे बाळकडूही तिथेच घेतले. पण जेरोम जर्मनीकडून खेळला, तर केव्हिन घानाकडून. हे दोघे २०१०च्या विश्वचषकामध्ये आमने-सामनेही आले होते. फुटबॉल विश्वचषकामध्ये दोन सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याचे हे पहिले उदाहरण ठरले.
पिता-पुत्र आणि भाऊबंदकीबरोबर वेगवेगळ्या नात्यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली आहे. दिएगो मॅरोडोना हे फुटबॉलमधील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व, फुटबॉल चाहत्यांचा देवच. आतापर्यंत बरेच विक्रम त्यांनी आपल्या नावावर केले असून त्यांचा जावई सेर्गियो अग्युएरोकडून फार मोठय़ा अपेक्षा चाहत्यांना असतील. मॅरेडोना यांची मुलगी जिआनिना यांचा सेर्गियो हा चीरंजीव मॅरेडोना यांच्यासारखाच लहान चणीचा, पण तेवढाच चपळ आणि आक्रमण करण्यात तरबेज असल्याचे सेर्गियोच्याबाबतीत म्हटले जाते. अर्जेटिनाकडून लहान वयामध्ये राष्ट्रीय संघासाठी पदार्पण करण्याचा विक्रम मॅरोडोना यांच्या नावावर होता, पण तो विक्रम सेर्गियोने आपल्या नावावर करत १५ वर्षे आणि ३५ दिवसांमध्ये त्याने अर्जेटिनासाठी जुलै २००५ मध्ये पदार्पण केले होते.
जेव्हियर हर्नाडिझच्या वडिलांबरोबर आजोबांनीही मेक्सिकोचे नेृतृत्व केले होते. जेव्हियर हर्नाडिझ बाल्काझर २०१० साली पहिल्यांदा विश्वचषकात खेळला होता. त्याचे वडील जेव्हियर हर्नाडिझ गुटीएरेझ यांनी १९८६च्या विश्वचषकात मेक्सिकोचे प्रतिनिधित्व केले होते, तर त्याचे आजोबा थॉमस बाल्काझर यांनी १९५४च्या विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
खरे पाहायला गेले तर क्रीडा जगताचा धर्मच मुळात फुटबॉल हा आहे. त्यामुळे या धर्माचे अनुयायी आपल्या कुटुंबातील व्यक्तींनीही व्हावे, अशी बऱ्याच जणांची धारणा आहे. पण ही घराणेशाही मात्र नाही, कारण इथे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशीच स्थिती असते. त्यामुळे गुणवत्ता नसली तरी कोणताही खेळाडू संघात टिकत नाही. आतापर्यंत एका कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती फुटबॉलच्या मैदानात आपण पाहिल्या, यापुढेही अशा एका कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती आपण पाहू. एकंदरीत काय तर कुटुंबे फुटबॉलमध्ये रंगून गेली आहेत.
प्रसाद लाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा