करिश्मा वाडकर, ऋचा राजोपाध्ये, निगेल डिसा, श्लोक रामचंद्रन व महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबरच पेट्रोलियम संघाकडून खेळणारी आदिती मुटाटकर यांनी दाजीसाहेब नातू स्मृती करंडक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविले.
मॉडर्न क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत राजोपाध्ये हिने मुख्य फेरीत स्थान मिळविताना आंध्र प्रदेशच्या एम. पूजा हिच्यावर १२-२१, २१-१९, २१-९ असा निसटता विजय मिळविला. मुटाटकर हिने चंडीगढच्या तन्वी शुक्ला हिचे आव्हान २१-८, २१-७ असे संपुष्टात आणले. वाडकर हिला दिल्लीच्या यामिनी शर्माकडून पुढे चाल मिळाली. वल्लरी बुकाने हिने आव्हान राखताना बी.अर्चना (आंध्र प्रदेश) हिला २१-७, २१-११ असे पराभूत केले.
पुरुषांच्या एकेरीत निगेल डिसा या महाराष्ट्राच्या खेळाडूने दीपांशुकुमार शर्मा (दिल्ली) याचे आव्हान २१-१४, २१-१३ असे लीलया संपविले. श्लोक रामचंद्रन या स्थानिक खेळाडूने मुख्य फेरीत स्थान मिळविताना आपलाच सहकारी हर्षिल भागवत याच्यावर २४-२२, १३-२१, २१-१४ असा रोमहर्षक विजय नोंदविला. सिद्धार्थ ठाकूर (महाराष्ट्र) यानेही मुख्य फेरी गाठली. त्याने आर.अनीत कुमार (आंध्र प्रदेश) याला २१-१३, २१-१५ असे पराभूत केले. कबीर कंझारकर याने ए.के.सुदर्शन (तामिळनाडू) याला पराभूत करीत मुख्य फेरीत प्रवेश केला. चुरशीने झालेला हा सामना त्याने १८-२१, २१-११, २१-७ असा जिंकला. एअर इंडियाच्या आदित्य जोशीने उत्तर प्रदेशच्या अन्साल यादवला २१-१३, २१-१९ असे हरवत मुख्य फेरीत स्थान मिळवले.
२४ वर्षीय पंच.. शिखा उपासनी
बॅडमिंटनमध्ये स्पर्धात्मक कारकीर्द करण्याऐवजी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द करण्याचा प्रयत्न २४ वर्षीय शीखा टिल्लू-उपासनी करीत आहे. मूळची धार (मध्य प्रदेश) येथील असलेल्या शिखाने शालेय व महाविद्यालयीन जीवनात बॅडमिंटनच्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी वैभव उपासनी यांच्याशी विवाह झाल्यानंतर तिने स्पर्धात्मक खेळाला रामराम ठोकला व पंच म्हणून नवी कारकीर्द सुरू केली आहे. तिची मोठी बहीण स्नेहा धनोदकर या देखील गेली पाच वर्षे या खेळातच पंच म्हणून काम करीत आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत शिखा हिने पंचांची परीक्षा दिली व त्यामध्येही प्रावीण्य मिळविले. या दोन्ही भगिनींचे वडील सदानंद टिल्लू यांनी अनेक खेळांमध्ये राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी या दोघींना बॅडमिंटनमध्ये पंच म्हणून काम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच या दोघींची पंच म्हणून दिमाखदार कारकीर्द होत आहे. पुण्याच्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत शिखा ही सर्वात लहान पंच आहे. गेले दोन दिवस साधारणपणे दररोज १० ते १२ सामन्यांमध्ये पंच म्हणून तिने काम केले आहे.

Story img Loader