कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्या एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना अटीतटीचे क्षण अनुभवायला मिळाले. अत्यंत चित्तथरारक झालेल्या लढतीत टीम इंडियाने लंकेला ३ गड्यांनी हरवले. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानेही या सामन्याचा आनंद घेतला. कर्णधार विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी या सामन्यातील थरारचा पुरेपूर आनंद लुटला. त्यांनी नव्या भारतीय संघालाही प्रोत्साहन दिले.
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहिला. या वेळी त्यांच्यासमवेत टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही उपस्थित होते. याशिवाय इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांनीही या सामन्याचा आनंद लुटला. टीम बसमध्ये प्रवास करत असतानाही सर्व खेळाडू हा सामना पाहत होते. रवीचंद्रन अश्विनने दीपक चहरच्या खेळीचे कौतुक केले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अत्यंत रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने ९ विकेट्स गमावत २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाने केवळ ६५ धावांत ३ गडी गमावले. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा पृथ्वी शॉ, इशान किशन आणि कर्णधार शिखर धवन लवकर बाद झाला.
When #TeamIndia in Durham cheered for #TeamIndia in Colombo.
From dressing room, dining room and on the bus, not a moment of this memorable win was missed. #SLvIND pic.twitter.com/IQt5xcpHnr
— BCCI (@BCCI) July 20, 2021
हेही वाचा – IND vs SL : सामना भारताने जिंकला, पण तब्बल ३०९३ चेंडूंनंतर भुवनेश्वर कुमारकडून झाली ‘ही’ चूक
११६ धावापर्यंत भारताने ५ विकेट्स गमावल्या होत्या आणि येथून विजयापर्यंत पोहोचणे फार अवघड वाटत होते. मात्र, यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्रुणाल पंड्या यांनी ४४ धावांच्या भागीदारीसह डावाची जबाबदारी स्वीकारली. पण सूर्यकुमार बाद झाल्यानंतर भारताची परिस्थिती पुन्हा एकदा बिकट झाली.
दीपक चहर-भुवनेश्वर कुमारची जोडी जमली
१९३च्या धावसंख्येवर संघाने आपली सातवी विकेट क्रुणाल पांड्याच्या रूपात गमावली. येथून भारताचा पराभव निश्चित दिसत होता. खालच्या फळीत उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांनी संघाला विजय मिळवून देण्याकरता जबरदस्त भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी नाबाद ८४ धावांची भागीदारी केली. दीपक चहरने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत नाबाद ६९ धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारही १९ धावांवर नाबाद राहिला.