पीटीआय, चेन्नई
कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या दुखापतीबाबत चिंता नसून अष्टपैलू बेन स्टोक्स मात्र आणखी आठवडाभर मैदानाबाहेरच राहणार असल्याचे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात स्टोक्सला चेन्नई संघाने तब्बल १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र, टाचेच्या दुखापतीमुळे स्टोक्सला चेन्नई संघाच्या सहापैकी केवळ दोन सामन्यांत खेळता आले आहे. तो ३ एप्रिलपासून सामना खेळलेला नाही. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याची माहिती फ्लेमिंग यांनी दिली.
‘‘तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या स्टोक्सला पुन्हा धक्का बसला आहे. तो आणखी आठवडाभर मैदानाबाहेर राहणार आहे. मात्र, त्याची दुखापत गंभीर नाही. तो लवकरच पुनरागमन करेल अशी आम्हाला आशा आहे. तो खूप मेहनत घेत आहे, त्यामुळे त्याला दोष दिला जाऊ शकत नाही,’’ असे फ्लेमिंग म्हणाले.
तसेच कर्णधार धोनीच्या दुखापतीची चिंता नसल्याचे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले. ‘‘धोनी दुखापत योग्यपणे हाताळत आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही. दुखापतीमुळे आपल्याला संघासाठी योगदान देणे शक्य नसल्याचे वाटल्यास धोनीने स्वत:हून विश्रांती घेतली असती. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे तो पुढील सामन्यांसाठीही उपलब्ध असेल,’’ असे फ्लेमिंग यांनी सांगितले.