बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली नेहमीच चर्चेत असतो. गांगुलीची गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये होते. बिनधास्त दादा अशी ओळख असलेला दादा टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना सल्लेही देत असतो. असाच एक सल्ला गांगुलीने टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या हार्दिक पंड्याला दिला होता. मात्र, हार्दिकने दादाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे.
हार्दिक पंड्याने १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या बडोदा संघात त्याचे नाव नाही. यात त्याचा भाऊ कृणाल पंड्याचे नाव समाविष्ट आहे. हार्दिक बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्यामुळे तो त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. टी-२० विश्वचषकापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. संघात पुनरागमन करण्यासाठी तो घाम गाळत आहे.
बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की हार्दिक पंड्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायचे आहे. गांगुली म्हणाला होता, ”हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती आणि त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी ब्रेक देण्यात आला होता, जेणेकरून तो टीम इंडियासाठी बराच काळ खेळू शकेल. मला खात्री आहे, की तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल.”
हेही वाचा – IND vs WI : इतका मोठा विजय मिळवूनही खूश नाही कॅप्टन रोहित! वाचा काय म्हणाला हिटमॅन
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले आहे. त्याच्यासोबत राशिद खान आणि स्टार सलामीवीर फलंदाज शुबमन गिल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सकडून हार्दिकने उत्कृष्ट कामगिरी केली होती.