पीटीआय, मेलबर्न

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आघाडीच्या फळीकडून धावा झाल्या नाहीत, तर नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव येतो. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी भरीव योगदान देणे आवश्यक असल्याचे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने सांगितले. पावसाने प्रभावित झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जडेजाने फलंदाज म्हणून आपली भूमिका चोख बजावली होती. पहिल्या डावातील त्याची ७७ धावांची खेळी सामना अनिर्णित राखण्यात निर्णायक ठरली होती.

‘‘जेव्हा भारताबाहेर कसोटी होते, तेव्हा आघाडीच्या फलंदाजांकडून होणाऱ्या धावा खूप महत्त्वाच्या असतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत सामने होतात, त्या वेळेसही आघाडीच्या फलंदाजांचे योगदान निर्णायक ठरत असते. आघाडीच्या फळीकडून धावा झाल्या नाहीत, तर त्याचे दडपण नंतर येणाऱ्या फलंदाजांवर येते,’’ असे जडेजा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर म्हणाला.

हेही वाचा >>>Robin Uthappa : भारताच्या माजी क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

चौथ्या कसोटी आघाडीच्या आणि मधल्या फळीकडून ही अपेक्षा पूर्ण केली जाईल अशा आशा बाळगून जडेजा म्हणाला,‘‘एक संघ म्हणून कामगिरी करण्यासाठीदेखील आघाडीच्या फळीची जबाबदारी मोठी असते. जर, प्रत्येकाने फलंदाजीत आपले योगदान दिले, तर धावफलकावर एक चांगली धावसंख्या उभी राहते. तिसऱ्या कसोटी सामन्यात केवळ केएल राहुलला आपली छाप पाडता आली होती. त्याच्याखेरीज एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नव्हता.’’ भारताच्या पडत्या डावात जडेजाची खेळी निर्णायक ठरली. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिलाच सामना खेळताना कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

‘‘पहिल्या दोन कसोटीत संधी न मिळणे माझ्यासाठी फायद्याचे ठरले. त्यामुळे मला येथील हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य झाले. सरावात फलंदाजी आणि गोलंदाजी केल्यामुळे कसोटी सामना खेळणे कठीण गेले नाही,’’ असेही जडेजा म्हणाला.

मालिकेतील आव्हानाविषयी जडेजाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खूप चुरशीने खेळला जाईल असे सांगितले. ‘‘मालिका सध्या बरोबरीत आहे. आता आम्ही एक जरी कसोटी जिंकली, तर अखेरच्या दोन मालिका आम्ही जिंकल्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडेच राहणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील राहतील,’’ असे जडेजाने नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी

अश्विनच्या निवृत्तीविषयी जडेजाने काहिशी नाराजी व्यक्त केली. ‘‘अश्विनचा निर्णय माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. मला शेवटच्या क्षणी याची माहिती मिळाली. आम्ही पूर्ण दिवस एकत्र घालवला, पण त्याने मला याविषयी पुसटशी कल्पनाही दिली नाही,’’ असे जडेजाने सांगितले.

‘‘अश्विनच्या साथीत मी अनेक सामने खेळलो आहे. मैदानावर आम्ही परिस्थितीबद्दल सातत्याने एकमेकांना संदेश देत असायचो. भारताला बदली खेळाडू मिळेल, पण मला त्याची उणीव भासेल,’’ असेही जडेजा म्हणाला.

वेळ जशी कुणासाठी थांबत नाही, तसा संघही कुणा एका खेळाडूसाठी थांबत नसतो. नवा खेळाडू संघाला मिळतो आणि संघ पुढे जात असतो. पुढे जाण्यासाठी तरुण खेळाडूंना चांगली संधी आहे. पण, अश्विन एक चांगला अष्टपैलू खेळाडू होता. त्याची जागा दुसरा कुणी घेऊ शकत नाही. – रवींद्र जडेजा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All rounder ravindra jadeja feels that contribution from top batsmen is essential ahead of the fourth test sports news amy