न्यूझीलंड दौऱ्यासाठी स्टुअर्ट बिन्नी आणि ईश्वर पांडेला संधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला भारताच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर १९ जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार असून, ईश्वर पांडे आणि स्टुअर्ट बिन्नी या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत युवराज सिंगला एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. त्या वेळी तो दुसऱ्या चेंडूवर भोपळाही फोडण्यात अपयशी ठरला होता. त्याच्याऐवजी भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांचे पुत्र स्टुअर्ट बिन्नीचा समावेश करण्यात आला आहे. २९ वर्षीय स्टुअर्टने ५३ प्रथम श्रेणी सामन्यांत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. यात ३४.७९च्या सरासरीने २७१४ धावा केल्या आहेत, तर ७९ बळी घेतले आहेत.
भारतीय संघात आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळवणारा आणखी एक खेळाडू म्हणजे मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांत स्थान देण्यात आले आहे.
दुखापतीतून सावरलेला २४ वर्षीय वेगवान गोलंदाज वरुण आरोन भारतीय संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रभाव पाडू न शकणाऱ्या मोहित शर्माऐवजी आरोनची वर्णी लावण्यात आली आहे. २०११मध्ये त्याने भारताचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला ही संधी मिळू शकेल.
भारताने कसोटी संघात फक्त एकमेव बदल केला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ सदस्यीय संघात प्रग्यान ओझाऐवजी ईश्वर पांडेला स्थान देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ओझाला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
२४ वर्षीय ईश्वरने ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २४.४३च्या सरासरीने १३१ बळी घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी न करू शकणाऱ्या आर. अश्विननेही आपले स्थान राखले आहे. त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर १-० असा विजय मिळवला होता.
मुरली विजय, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने आपल्या कामगिरीच्या बळावर कसोटी संघात स्थान मिळवले आहे, तर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यावर निवड समितीने विश्वास प्रकट केला आहे.
कसोटी संघात भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा झहीर खानकडे सोपवण्यात आली आहे, तर इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि पांडे न्यूझीलंडवरील वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टय़ांवर त्याला साथ देतील. एकदिवसीय संघात यापैकी झहीर नसून, इशांतकडे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व असेल.
न्यूझीलंड दौऱ्याचा कार्यक्रम
तारीख सामना स्थळ
१९ जानेवारी पहिला एकदिवसीय नेपियर
२२ जानेवारी दुसरा एकदिवसीय हेमिल्टन
२५ जानेवारी तिसरा एकदिवसीय ऑकलंड
२८ जानेवारी चौथा एकदिवसीय हेमिल्टन
३१ जानेवारी पाचवा एकदिवसीय वेलिंग्टन
२ फेब्रुवारी सराव सामना वांघारेइ
६ ते १० फेब्रुवारी पहिली कसोटी ऑकलंड
१४ ते १८ फेब्रुवारी दुसरी कसोटी वेलिंग्टन