माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांचे मत
आगामी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात नसले तरी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे इतर संघांनी नक्कीच धसका घेतला असेल, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांनी सोमवारी व्यक्त केली.
गतवर्षी चेंडू फेरफार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांना एका वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. मात्र दोघांनीही नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन केले. विशेषत: वॉर्नरने १२ सामन्यांत ६९२ धावा करताना स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ‘ऑरेंज कॅप’ मिळवली, तर स्मिथने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सराव सामन्यांत एका अर्धशतकासह दमदार फलंदाजी केली.
त्यामुळेच वॉ यांना ऑस्ट्रेलियापासून सर्व संघांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे वाटते. ‘‘ऑस्ट्रेलियापासून अन्य संघ नक्कीच सावधानता बाळगतील. गेल्या १२ महिन्यांत ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, मात्र आता भूतकाळाला विसरून पुढे जाणे गरजेचे आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने ०-२ अशा पिछाडीवरून ३-२ अशी मालिका जिंकून ते पुन्हा एकदा विश्वविजेतेपदासाठी सज्ज आहेत, हे सिद्ध केले. त्यातच आता स्मिथ व वॉर्नरदेखील परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे १५ही खेळाडू सर्वोत्तम आहेत,’’ असे वॉ म्हणाले. याव्यतिरिक्त विश्वचषकात वॉर्नर-स्मिथ यांच्यापेक्षा उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल यांची कामगिरी पाहण्यासाठीसुद्धा मी उत्सुक आहे, असे ५३ वर्षीय वॉ यांनी सांगितले.
जगज्जेतेपदासाठी इंग्लंडला पसंती; भारताला तिसरे स्थान!
इंग्लंडचा संघ सर्वच आघाडय़ांवर परिपूर्ण असल्यामुळे आगामी विश्वचषकासाठी वॉ यांनी इंग्लंडलाच विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. ‘‘गेल्या दोन वर्षांत इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भरारी घेतली असून घरच्या मैदानांवरच खेळत असल्यामुळे ते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. ट्रेव्हर बेलिस यांच्या रूपात त्यांना उत्तम प्रशिक्षक लाभला आहे. त्याशिवाय अनुभवी कर्णधार, धडाकेबाज सलामीवीर, प्रतिभावान अष्टपैलू व गोलंदाजांची फळी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांना मी विजेतेपदाच्या शर्यतीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देईन,’’ असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार वॉ यांनी सांगितले.