मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ( एमसीए ) ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट संघटना असलेली एमसीएची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात आता निवडणुकीला वेगळं वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी खेळाडू संदीप पाटलांना धक्का दिला आहे. शरद पवारांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
२० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध माजी अध्यक्ष शरद पवार यांचे गट समोरासमोर येणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. एमसीए निवडणुकीत समीकरणं अचानक बदलली आहेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत युती केल्याचं नुकतंच जाहीर केल आहे. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
शरद पवार आणि आशिष शेलार गटाने संयुक्त पॅनलसह लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना खूप मोठा धक्का बसला असून ते एकाकी पडले आहेत. पवार व शेलार गट यांनी एकत्रित पॅनल उभे करत आशिष शेलार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले आहे. आज नेहरू हॉल येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच स्वतंत्र लढू इच्छिणारे शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी देखील शेलार यांना पाठिंबा दर्शविला आहे.
हेही वाचा : चेतेश्वर पुजारा लवकरच एका नवीन संघासोबत खेळणार, सोशल मीडियावर केली घोषणा
पवार आणि शेलार यांचे गट एकमेकांसमोर लढतील असे चित्र रंगवले जात होते. मात्र शरद पवार यांच्या गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी बघता असे दिसते की, त्यात संदीप पाटील यांचे नाव आहे. या सगळ्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आणि दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्याकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे यापूर्वी त्यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या माजी क्रिकेटपटू संदीप पाटील व कार्यकारणीच्या इतर सभासदांचे भवितव्य अधांतरी दिसत आहे. त्यावेळी सचिव पदासाठी अर्ज भरलेल्या अजिंक्य नाईक यांनी शेलार-पवार संयुक्त गटातर्फे देखील अर्ज दाखल केला. तर, उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या अमोल काळे यांना संधी दिली गेली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही २८ सप्टेंबरला होणार होती. मात्र आता तारीख बदलली असून येत्या २० ऑक्टोबरला होणार आहे. उमेदवारी भरण्याची आज शेवटची मुदत होती. दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे संदीप पाटील यांनी जाहीर केले असून त्यावर ते ठाम आहेत.