हिमालयाच्या दूरवर पसरलेल्या आणि बर्फाने नटलेल्या पर्वतरांगा.. मध्येच होणारा बर्फाचा पाऊस, त्याने निसरडे होणारे रस्ते.. एका बाजूला मोठमोठाले डोंगर, त्यांच्या मधून दरड कोसळण्याची भीती.. तर दुसऱ्या बाजूला खोलवर दरी.. घाटातले वळणा-वळणाचे रस्ते.. एका सेकंदाची चूक जिवाशी खेळ करणारी.. खडकाळ रस्ते, पुढची गाडी गेल्यावर उडणारी धूळ आणि त्यामुळे दिशाहीन झालेले रस्ते.. सूर्य असताना वाऱ्यानुसार कूस बदलणारे वातावरण आणि सूर्यास्तानंतर पडणारी जीवघेणी थंडी.. या साऱ्यावर मात करतानाचा शारीरिकतेबरोबरच लागणारी मानसिकतेची कसोटी.. जगातल्या अव्वल दहा मोटरस्पोर्ट्स स्पर्धामधल्या ‘१४व्या मारुती सुझुकी- रेड दी हिमालय’ या शर्यतीचा थरार काही औरच होता.. शिमला ते लेह हे १८०० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली आणि फक्त ३० टक्के स्पर्धकांनाच ही शर्यत पूर्ण करता आली यावरूनच ही शर्यत किती खडतर असते आणि यामध्ये किती कसब लागते हे कळू शकते. पण या स्पर्धेत हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या सुरेश राणाने आपला सहकारी परमिंदर याच्यासह ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली आणि या स्पर्धेवर पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला. सात वेळा जिप्सी चालवणाऱ्या राणाने या वेळी मारुतीची ग्रॅण्ड व्हिटारा ही गाडी शर्यतीसाठी निवडली तेव्हा अनेकांनी भूवया उंचावल्या होत्या, पण गाडी कोणताही असली तरी त्याने विजयात काहीही फरक पडत नाही हे राणाने या वेळी दाखवून दिले. राणाने ही स्पर्धा ९ तास ०८ मिनिटे आणि ४६ सेकंदांमध्ये पूर्ण केली, तर या गटात उपविजेत्या ठरलेल्या अहलुवालिया-मनसुखानी जोडीला हे अंतर पार करण्यासाठी ९ तास २४ मिनिटे आणि २४ सेकंद लागली.
‘या वेळी मी गाडी बदलली होती, त्यामुळे काही जणांनी माझ्याकडून विजयाची अपेक्षा ठेवली नव्हती. पण माझा स्वत:वर आणि मारुतीच्या गाडीवर विश्वास होता. आठव्यांदा ही खडतर स्पर्धा जिंकल्याचा आनंद नक्कीच आहे. आता पुढच्या स्पर्धेची मी वाट पाहीन,’ असे राणाने जिंकल्यावर सांगितले.
राष्ट्रीय विजेता असलेल्या एस. संतोषने ‘होंडा सीआरएफ’ या दुचाकीच्या जोवर खडतर गटात विजेतेपद पटकावले. तर चारचाकींच्या साहसी गटात के. प्रसाद आणि एम. चंद्रशेखर यांनी मारुतीच्याच ‘ग्रॅण्ड व्हिटारा’गाडीसह अव्वल क्रमांक पटकावला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा