ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही मालिका अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरवू शकते. सध्या ऑस्ट्रेलियन संघ ७० गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतीय संघ ५२.०८ गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका (६०) दुसऱ्या तर श्रीलंका (५३.३३) तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत अव्वल दोन संघ पुढील वर्षी अंतिम सामना खेळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, ज्याला बॉर्डर- गावसकर करंडक म्हणूनही ओळखले जाते, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआयने, तारखा आणि यजमान शहर अद्याप जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम चारपैकी एका कसोटी सामन्याचे आयोजन करू शकते. असे झाल्यास अरुण जेटली स्टेडियम पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन करेन.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही मालिका चार सामन्यांची असून त्यांतील एक सामना दिल्ली खेळला जाईल. राहिलेले तीन सामने अहमदाबाद, धर्मशाला आणि चेन्नई याठिकाणी खेळले जाण्याची पूर्ण शक्यता सांगितली गेली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातील भारताचे हे शेवटचे चार कसोटी सामने असतील. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका ४-० अशा अंतराने जिंकवी लागणार आहे. मात्र, रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देईलच याची खूप कमी शक्यता आहे.

दिल्लीमध्ये २०१७ साली खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना

बीसीसीआयच्या रोटेशन पॅालिसीनुसार, दिल्लीला एका कसोटी सामन्याचे यजमानपद मिळेल, कारण कोविड दरम्यान येथे एकही सामना खेळला गेला नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात डिसेंबर २०१७ मध्ये येथे शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन दिल्ली करू शकते. बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.”

हेही वाचा :  “कोणताही दबाव न घेता फलंदाजी करा, पण…”, प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणचा भारतीय संघाला सल्ला  

धर्मशाला, जिथे सहा वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळली गेली होती, तिथे तिसरी कसोटी आयोजित केली जाऊ शकते, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. धर्मशाला येथे शेवटची कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च २०१७ मध्ये खेळली गेली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला चेन्नई किंवा हैदराबादमधून सुरू होऊ शकते. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी दिवस-रात्र होणार की नाही हे अजून ठरवायचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almost after five years test match will be held in delhi team india will host the border gavaskar trophy avw