महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरुन सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहे. काहींच्या मते धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारायला हवी तर काहींच्या मते भारतीय संघात धोनीची अद्याप गरज आहे. दररोज सोशल मीडियावर अशा चर्चा घडत असतात, मात्र भारतीय संघात धोनीची जागा घेणं कठीण असल्याचं मत यष्टीरक्षक पार्थिव पटेलने व्यक्त केलं आहे.
“एखादा यष्टीरक्षक जेव्हा भारतीय संघाकडून खेळत असतो त्यावेळी त्याने इतर २७ यष्टीरक्षकांवर मात करुन संघात जागा मिळवली असते. भारतीय संघात यष्टीरक्षणाची संधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी सारख्या खेळाडूची जागा घेण्याचा विषय होतो, त्यावेळी ते खरंच कठीण असतं. धोनीने भारतीय संघासाठी आतापर्यंत खूप काही केलं आहे, त्याचे निकाल आपण आता पाहतोच आहोत. भारतीय संघात धोनीची जागा घेणं खरचं कठीण आहे. पण आपल्याला योग्य उमेदवार मिळेल.” विजय हजारे करंडक स्पर्धेदरम्यान पार्थिव पत्रकारांशी बोलत होता.
अवश्य वाचा – जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिली महत्वाची बातमी….
विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या निवड समितीने धोनीऐवजी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं. मात्र वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पंतने फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली. यानंतर सोशल मीडियात धोनीला पुन्हा एकदा संघात स्थान देण्याची मागणी सुरु झाली. दरम्यान आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संघात संधी देण्याच्या विचारात भारतीय संघ व्यवस्थापन असल्याचं कळतंय. त्यामुळे आगामी काळात पंत आपल्या फलंदाजीत सुधारणा कधी करतो आणि धोनी संघात पुनरागमन कधी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.