कोलकाता इथे आयोजित एका कार्यक्रमात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सहभागी झाला होता. निवेदकाने गंभीरला विचारलं की मी टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाशी बोलतोय का? या प्रश्नानंतर काही सेकंद शांततेत गेली. गंभीरने विचार केला, तो हसला आणि त्याने उत्तर दिलं.
गंभीर म्हणाला, ‘मी एवढा पुढचा विचार करत नाही. तुम्ही मला सगळे कठीण प्रश्न विचारत आहात. आता काही उत्तर देणं अवघड आहे. मी आता एवढंच सांगू इच्छितो की कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. हे आमचं तिसरं जेतेपद आहे. अतिशय आनंद आणि समाधानकारक क्षण आहे. यंदाचा हंगाम म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. मी या विजयाचा आनंद साजरा करतो आहे. आता माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे’.
हेही वाचा – SA Vs Eng T20 World Cup: चित्तथरारक कॅच, अचंबित करणारा रनआऊट आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी मॅच
गंभीर पुढे म्हणाला, ‘मी नेहमी एक गोष्ट सांगतो. क्रिकेट सांघिक खेळ आहे. एखादा खेळाडू खेळापेक्षा मोठा असू शकत नाही. संघातील प्रत्येकाकडे एक जबाबदारी असते. त्यांनी ती निभावणं अपेक्षित असतं. कोलकाताच्या प्रत्येक खेळाडूने आपापली भूमिका चोख निभावली, म्हणून हे जेतेपद प्रत्यक्षात साकारु शकलं’.
क्रिकेटमध्ये कोणत्या गोष्टीत बदल व्हावा असं वाटतं यावर गंभीर म्हणाला, ‘एका गोष्टीत बदल व्हावा असं वाटतं. वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये दोन चेंडूंचा वापर. फिरकीपटूंसाठी हे अन्यायकारक आहे. त्यामुळेच वनडे आणि टी२० प्रकारात पुरेशा प्रमाणात फिरकीपटू खेळत नाहीयेत. हे योग्य नाही.’
अनेक तज्ज्ञांच्या मते दोन बाजूंनी दोन चेंडू वापरल्याने फिरकीपटूंना फटका बसतो. चेंडू रिव्हर्स स्विंग होण्याची शक्यताही कमी होते.
४२वर्षीय गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ऑनलाईन माध्यमातून या पदासाठी मुलाखत दिली. ५८ टेस्ट, १४७ वनडे आणि ३७ टी२० सामन्यात त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टेस्ट तसंच वनडे क्रिकेटमध्ये गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही भारतीय संघासाठी स्थिर सलामीची जोडी होती. २००७ मध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत तसंच २०११ वनडे वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत त्याने दिमाखदार खेळी साकारली होती. दोन्ही विजयांचा गंभीर शिल्पकार होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
आयपीएल स्पर्धेत गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोनदा जेतेपदाची कमाई केली. यंदाच्या वर्षी गंभीर कोलकाता संघाचा मेन्टॉर होता. गेले दोन हंगाम गंभीर लखनौ सुपरजायंट्स संघाचा मेन्टॉर होता.